Nepali student Found Dead in Bhubaneswar KIIT : ओडिशाच्या भुवनेश्वर येथील कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी (KIIT) मध्ये नेपाळच्या एका २० वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याच्या घटनेला दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला आहे, यानंतर गुरूवारी या इंस्टिट्यूटच्या वसतिगृहात आणखी एका विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे.

द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार वसतिगृहाच्या वार्डनला रात्री ८ वाजताच्या सुमारास मुलगी तिच्या खोलीमध्ये मृत अवस्थेत आढळली, यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. दरम्यान मृत मुलगी ही इंजीनियरिंगच्या पहिल्या वर्षाची विद्यार्थी होती आणि ती मूळची नेपाळमधील बिरगंज येथील होती.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस आयुक्त आणि भुवनेश्वरचे पोलीस अधीक्षक एस देव दत्ता सिंह हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि या घटनेचा तपास सुरू करण्यात आला.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री सात वाजता हजेरी घेतली असता या विद्यार्थीनीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर ती तिच्या खोलीमध्ये मृत आढळली. आयुक्त सिंह यांनी सांगितलं की, यानंतर पोलीस वैज्ञानिक पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि खोलीची तपासणी केली जात आहे.

“आम्ही अनैसर्गिक मृत्यूचे प्रकरण नोंदवले आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. जर आम्हाला यामध्ये कोणाचा सहभाग आढळून आला, तर आम्ही सर्व बाजूनी तपास करू. मृत महिलेला काही त्रास होता का किंवा तिने काही सांगितले होते का हे तपासण्यासाठी वसतिगृहातील विद्यार्थ्यांची चौकशी केली जात आहे. आम्ही मृतदेह ताब्यात घेतला आहे आणि तो शवविच्छेदनासाठी एआयआयएमएस येथे पाठवण्यात आला आहे,” असे पोलीस आयुक्त म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच त्यांनी सांगितले की, दिल्ली येथील नेपाळ दुतावासाला या घटनेबद्दल माहिती कळवण्यात आली आहे आणि त्यांनी मुलीच्या कुटुंबियांशी संपर्क केला आहे, ते शुक्रवारी भुवनेश्वर येथे दाखल होतील. पालक आल्यानंतर शवविच्छेदन केले जाईल. केआयआयटीच्या प्रशासनाने सांगितले की पोलीस घटनेचा तपास करत आहेत आणि संस्था तपास प्रक्रियेत संपूर्ण सहकार्य करत आहे.