Youtuber Jasbir Singh Arrested : पाकिस्तानासाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ज्योती मल्होत्रा या युट्यूबरला अटक करण्यात आल्यानंतर आता आणखी एका युट्यूबरला अटक करण्यात आली आहे. जान महल या नावाने युट्यूब चॅनेल चालवारा जसबीर सिंग याच्यावरही हेरगिरीचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याच्या युट्यूबचे जवळपास ११ लाख सबस्क्रायबर्स आहेत. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

रुपनगर जिल्ह्यातील महलान गावातील रहिवासी असलेल्या सिंगवर मोहाली येथील स्टेट स्पेशल ऑपरेशन्स सेल (SSOC) ने ही कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारावर त्याला अटक करण्यात आली. हरियाणातील ज्योती मल्होत्राशीही त्याचा नियमित संपर्क होता. पंजाब पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जसबीर सिंगचे पाकिस्तानी गुप्तचर अधिकारी शाकीर उर्फ ​​जुट रंधावाशी जवळचे संबंध होते, जो भारतीय वंशाचा असून तो इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (ISI) साठी काम करत असल्याचा संशय आहे.

पाकिस्तानला तीनवेळा भेट

जसबीर सिंग एहसान-उर-रहीम उर्फ ​​दानिश या पाकिस्तानी नागरिकाशीही संपर्कात होता. हेरगिरीच्या आरोपाखाली यापूर्वी त्यालाही हद्दपार करण्यात आलं होतं. अधिकाऱ्यांनी सांगितले की , दानिशच्या निमंत्रणावरून सिंग दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासात पाकिस्तान राष्ट्रीय दिनाच्या समारंभाला उपस्थित राहिला होता. जसबीर सिंगने २०२०, २०२१ आणि २०२४ मध्ये तीन वेळा पाकिस्तानला भेट दिली आहे.

संपर्काचे सर्व ट्रेस हटवण्याचा प्रयत्न

त्याच्याकडील इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी करण्यात आली असून त्याच्याकडे अनेक पाकिस्तानआधारित संपर्क आहेत. ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर, सिंगने आयएसआयशी संबंधित कार्यकर्त्यांशी झालेल्या संपर्काचे सर्व ट्रेस हटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की ते हेरगिरी-दहशतवादी नेटवर्कची संपूर्ण व्याप्ती उघड करण्यासाठी आणि त्यात सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी काम करत आहेत.

पंजाब पोलिसांनी काय म्हटलंय?

“जान महल नावाचे #YouTube चॅनेल चालवणारा जसबीर सिंग हा दहशतवादी समर्थित हेरगिरी नेटवर्कचा भाग असलेल्या पीआयओ शाकीर उर्फ ​​जुट रंधावाशी संबंधित असल्याचे आढळून आले आहे. त्याने हरियाणास्थिती YouTuber ज्योती मल्होत्रा आणि पाकिस्तानी नागरिक आणि हद्दपार केलेले पाक उच्चायोग अधिकारी एहसान-उर-रहीम उर्फ ​​दानिश याच्याशीही जवळचे संपर्क ठेवले होते”, असं पंजाब पोलिसांनी X वरील एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“हेरगिरी-दहशतवादाचे व्यापक नेटवर्क उध्वस्त करण्यासाठी आणि सर्व सहयोगींची ओळख पटविण्यासाठी तपास सुरू आहे”, असंही त्यात म्हटले आहे. आतापर्यंत पंजाब पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली सात जणांना अटक केली आहे . फलकशेर मसीह आणि सूरज मसीह यांना अमृतसरमधील अजनाला येथून अटक करण्यात आली होती आणि मालेरकोटला येथील रहिवासी असलेल्या ३१ वर्षीय महिला गुजाला आणि यामीन मोहम्मद यांनाही गेल्या महिन्यात ताब्यात घेण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयएसआयला संवेदनशील लष्करी माहिती शेअर केल्याबद्दल गुरदासपूर येथून पोलिसांनी सुखप्रीत सिंग आणि करणबीर सिंग या दोघांनाही अटक केली.