High Court : भारतीय जनता पक्षाचे कर्नाटकमधील नेते तथा आमदार एन रविकुमार यांनी कलबुर्गी जिल्ह्यातील उपायुक्त फौजिया तरनुम यांच्याबाबत केलेल्या एका वादग्रस्त टिप्पणीनंतर नव्या वादाला तोंड फुटलं होतं. यावरून विरोधकांनी भाजपावर टीकेची झोड उठवली होती. यानंतर आमदार एन रविकुमार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर हा वाद थेट कर्नाटकच्या उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयाने भाजपाचे आमदार एन.रविकुमार यांना कलबुर्गीच्या उपायुक्त फौजिया तरनुम यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून माफी मागण्यास सांगितलं आहे. दरम्यान, एन.रविकुमार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दाखल झालेला एफआयआर रद्द करण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली होती. यावरील सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती सूरज गोविंदराज यांच्या खंडपीठाने काही महत्वाची निरीक्षणे नोंदवले आहेत.

यावेळी न्यायाधीशांनी म्हटलं की, “अशा प्रकारची विधाने करू नका. मध्य प्रदेश आणि सर्वोच्च न्यायालयात एका विद्यमान मंत्र्यांबरोबर काय घडलं ते तुम्ही पाहिलं असेल. तुम्ही देखील वेगळे नाही आहात. तुम्ही अशी विधाने करू शकत नाहीत”, असं न्यायाधीशांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

तसेच यावेळी न्यायाधीशांनी मध्य प्रदेशातील अलिकडच्या घटनेचा संदर्भ दिला. मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री विजय शाह यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान ब्रीफिंगचे नेतृत्व करणाऱ्या भारतीय लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मंत्री विजय शाह यांनी म्हटलं होतं की, “पंतप्रधानांनी दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानमधील लोकांसारख्याच समुदायातील एका बहिणीला पाठवलं.” दरम्यान, या विधानावरून देशभरात मोठा संताप निर्माण झाला होता. त्यामुळे मंत्री विजय शाह हे अडचणीत आले होते.

त्यानंतर आता भारतीय जनता पक्षाचे आमदार एन रविकुमार हे देखील त्यांच्या विधानामुळे अडचणीत आले आहेत. आमदार एन.रविकुमार यांनी उपायुक्त फौजिया तरनुम यांच्याबाबत बोलताना त्यांचा उल्लेख कथितपणे पाकिस्तानी असा केला होता. त्यानंतर पोलिसांनी रविकुमार यांच्या वक्तव्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. तसेच या टिप्पणीमुळे राजकीय प्रतिक्रिया उमटल्या होत्या. काँग्रेसच्या आमदारांनी यावरून राज्यपालांकडे औपचारिक तक्रार सादर करत कारवाईची मागणी केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कर्नाटक उच्च न्यायालयाने आमदार एन.रविकुमार यांना कलबुर्गीच्या उपायुक्त फौजिया तरनुम यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून माफी मागण्यास सांगितल्याच्या निर्णयानंतर अधिकारी फौजिया तरनुम यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “मी या विषयावर भाष्य करू इच्छित नाही. हा न्यायालयाचा निर्णय आहे आणि मला वाटतं की न्यायालयाचा आदर केला पाहिजे. मी माझं काम पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यावर भर देत आहे.”