Apologize To India Edward Price Slams Donald Trump: न्यू यॉर्क विद्यापीठातील सहायक प्राध्यापक आणि अमेरिकेच्या गृह विभागाचे माजी प्रवक्ते एडवर्ड प्राइस यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारतावरील ५० टक्के टॅरिफ ताबडतोब मागे घेण्याचे, ते शून्यावर आणण्याचे आणि भारताची माफी मागण्याचे आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी इशारा दिला की, दंडात्मक व्यापार उपाययोजणांमुळे अमेरिकेची या शतकातील सर्वात महत्त्वाची धोरणात्मक भागीदारीला फटका बसत आहे.
भारताची माफी मागावी
भारत-अमेरिका संबंध आणि टॅरिफबाबात बोलताना एडवर्ड प्राइस म्हणाले की, “आपल्याला भारतावरील ५० टक्के टॅरिफ काढून टाकण्याची आणि तो अधिक वाजवी बनवण्याची गरज आहे. माझ्या मते भारतावरील टॅरिफ शून्य टक्के करावे आणि भारताची माफी मागावी, अशी माझी सूचना आहे.”
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना एडवर्ड प्राइस म्हणाले, “भारत आणि अमेरिकेतील भागीदारी ही २१ व्या शतकातील सर्वात महत्त्वाची भागीदारी आहे. ही भागीदारी चीन आणि रशियामध्ये काय घडते हे ठरवेल. २१ व्या शतकात भारताची भूमिका निर्णायक आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष चीनशी संघर्ष करत आहेत, रशियाशी युद्धाबाबत वाटाघाडी करत आहेत, अशा परिस्थितीत त्यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ का लादले हे मला समजत नाही.”
डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने भारतावर लादलेल्या ५० टक्के टॅरिफ पॅकेजमध्ये भारतीय निर्यातीवर २५ टक्के टॅरिफ आणि भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतो म्हणून २५ टक्के टॅरिफ यांचा समावेश आहे. ट्रम्प यांनी भारत “युक्रेनवरील रशियाच्या प्राणघातक हल्ल्यांना खतपाणी घालत आहे”, असा आरोप केला आहे. असे असले तरी ट्रम्प यांनी रशियावर कोणतेही कठोर निर्बंध लादले नाहीत.
पंतप्रधान मोदी खूपच हुशार
यावेळी एडवर्ड प्राइस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला कोणत्याही गटात न अडकवता अमेरिका, रशिया आणि चीनबरोबर एकत्रित वाटचाल करण्याच्या क्षमतेबद्दल त्यांचे कौतुक केले. “पंतप्रधान मोदी खूपच हुशार आहेत. ते अमेरिकन लोकांना, माझ्यासारख्या लोकांना आठवण करून देत आहेत की त्यांच्याकडे पर्याय आहेत, परंतु त्यांनी चीन आणि रशियाला पूर्णपणे स्वीकारलेले नाहीत.”
अनेक वर्षांच्या प्रगतीला धोका
जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला लोकशाही देश आणि क्वाड सुरक्षा गटाचा आधारस्तंभ असलेला भारत, इंडो-पॅसिफिकमधील अमेरिकेच्या धोरणात महत्त्वाचा भाग बनला आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ आक्रमकतेमुळे विश्वास निर्माण करण्याच्या अनेक वर्षांच्या प्रगतीला धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा प्राइस यांनी दिला.