iPhone Export From India To US: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांना आयफोनचे उत्पादन भारतातून अमेरिकेत हलवण्याचे आवाहन केले होते. मात्र, टिम कुक यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या या आवाहनाकडे दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळत आहे. कारण ओमडिया रिसर्च फर्मच्या मते, एप्रिल महिन्यात अ‍ॅपलच्या पुरवठादारांनी भारतातून अमेरिकेत २९ लाख दशलक्ष आयफोन निर्यात केले आहेत. यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ७६% वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

ओमडियाने रिसर्च फर्मने म्हटले आहे की, एप्रिलमध्ये अमेरिकेत चीनी आयफोन निर्यात ७६% ने कमी होऊन ९ लाख युनिट्सवर आली आहे, जी मागील वर्षी ३७ लाख युनिट्स होती. काउंटरपॉइंट रिसर्चच्या प्राथमिक मूल्यांकनानुसार एप्रिलमध्ये अमेरिकेत भारतीय आयफोन निर्यात २९ ते ३० लाख युनिट्स दरम्यान होती. याबाबत इकॉनॉमिक टाइम्सने वृत्त दिले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काहीदिवसांपूर्वीच अ‍ॅपलला इशारा दिला होता की, जर त्यांनी आयफोनची निर्मिती अमेरिकेत न करता त्याची आयात केली तर त्यावर २५% कर लागू करण्यात येईल. पण अ‍ॅपलने अमेरिकेत आयफोन निर्मिती सुरू केल्यास, आयफोनच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

अ‍ॅपलने जर अमेरिकेत आयफोनची निर्मिती सुरू केली तर, कामगारांचे पगार, सुट्या भागांची खरेदी आणि पुरवठा साखळीतील गुंतागुंतीमुळे आयफोनच्या प्रो मॉडेल्सची किंमत सध्याच्या १,११९ डॉलर्सच्या तुलनेत ३,००० डॉलर्सपेक्षा जास्त वाढू शकते.

याबाबत बोलताना हाँगकाँगमधील टीएफ सिक्युरिटीजचे अ‍ॅपल विश्लेषक मिंग-ची कुओ यांनी फायनान्शिअल डेलीला सांगितले की, “नफाक्षमतेच्या बाबतीत, आयफोन असेंब्ली लाईन्स परत अमेरिकेत हलवण्यापेक्षा अमेरिकन बाजारात विकल्या जाणाऱ्या आयफोनवर २५% टॅरिफचा फटका सहन करणे अ‍ॅपलला खूप फायदेशीर आहे.”

दरम्यान अ‍ॅपलची भारतातील उत्पादन भागीदार कंपनी फॉक्सकॉनने आयफोनचे उत्पादन वाढवण्यासाठी चेन्नईमध्ये त्यांच्या कारखान्याचा विस्तार करण्यासाठी १.५ अब्ज युरोंची नवीन गुंतवणूक जाहीर केली आहे. फॉक्सकॉनने कर्नाटकमध्ये एक नवीन कारखाना देखील सुरू केला असून, त्यातून जूनपासून आयफोन डिलिव्हरी सुरू होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचबरोबर अ‍ॅपलची दुसरी सर्वात मोठी आयफोन उत्पादक भागीदार कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्सनेही, त्यांच्या होसूर कारखान्यात आयफोन असेंब्लीसाठी उत्पादन क्षमता वाढवत आहे.