भारतीय हवाईदलाचे (आयएएफ) मार्शल आणि ‘फाइव्ह स्टार रँक’ प्राप्त अधिकारी अर्जन सिंह यांचे शनिवारी सायंकाळी दिल्लीतील लष्कराच्या रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. वयाच्या ९८ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फील्ड मार्शलचा दर्जा मिळालेले अर्जन सिंह हे हवाई दलाचे एकमेव अधिकारी होते. वयाच्या ४५ व्या वर्षी ते सर्वांत तरूण वायूसेना प्रमुख झाले होते. १९१९ मध्ये त्यांचा पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात जन्म झाला होता. भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. १९६५ च्या भारत पाक युद्धात त्यांनी महत्वाची भूमिका निभावली होती.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्शल अर्जन सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. अर्जन सिंह यांचे योगदान देश कायम स्मरणात ठेवेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही अर्जन सिंह यांच्या निधनाबद्दल दुख: व्यक्त केली.

त्यांच्या ९७ व्या वाढदिवसादिवशी म्हणजे २०१६ मध्ये पश्चिम बंगालमधील पानागड येथील हवाई दलाच्या एअर बेसला त्यांचे नाव देण्यात आले होते. हवाई दलाचे पानागड विमानतळ आता अर्जन सिंह यांच्या नावाने ओळखले जाते. जिवंतपणी एका विमानतळाला नाव देण्यात आलेले ते एकमेव अधिकारी आहेत. तत्पूर्वी, अर्जन सिंह यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रूग्णालयात धाव घेतली होती.

आपल्या गौरवशाली कारकीर्दीत त्यांनी ६० विविध प्रकारची विमाने उडवली होती. १९६९ मध्ये सेवानिवृत्त होतानाही त्यांनी विमानाचे उड्डाण करून आपल्यातील जोश कमी झाला नसल्याचे दाखवून दिले होते. ते जेव्हा एअर स्टाफचे प्रमुख होते त्या वेळी आयएएफमध्ये सुपरसॉनिक फायटर्स, टॅक्टिकल ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि असॉल्ट हेलिकॉप्टर्सचा समावेश करण्यात आला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arjan singh indian air force marshal and war hero dies at
First published on: 16-09-2017 at 21:38 IST