Manipur Violence : मणिपूर उच्च न्यायालयाच्या एका आदेशामुळे येथे तणाव वाढला आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याकरता लष्कर आणि आसाम रायफल्स तैनात करण्यात आले आहे. लष्करी जवानांकडून राज्यातील विविध भागात फ्लॅग मार्च काढण्यात आला आहे. मणिपूर नागरिक प्रशासनाच्या निवेदनानुसार राज्याच्या विविध भागात लष्कराचे फ्लॅग मार्च होत असल्याची माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे. बुधवार सायंकाळपासून हे जवान तैनात करण्यात आले असून कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवले जात आहे.
इम्फाळ, चुराचंदपूर आणि कांगपोक्पी येथे बुधवारी रात्री हिंसाचार घडल्यानंतर मणिपूरच्या आठ जिल्ह्यांमध्ये संचारंबंदी लागू करण्यात आली. हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्याकरता लष्कर आणि आसाम रायफल्सना पाचारण करण्यात आले. भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सकडून विविध जिल्ह्यांमध्ये फ्लॅग मार्च आयोजित करण्यात आला. तसंच, सुरक्षेच्या कारणास्तव लष्कर छावणी आणि सरकारच्या शासकीय निवासस्थानांमध्ये जवळपास ४ हजार नागरिकांना हलवण्यात आले आहे.
हेही वाचा >> “…तर आम्ही सर्व पदकं परत करू”; दिल्ली पोलिसांशी झालेल्या वादानंतर बजरंग पुनियाचा केंद्र सरकारला इशारा!
दरम्यान, मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू झाल्याने बॉक्सर मेरी कॉम यांनीही ट्वीट केलं आहे. “माझं राज्य जळतंय, कृपया मदत करा” अशा आशयाचं ट्वीट करत त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मणिपूरमध्ये ५३ टक्के मैती समाज आहे. मणिपूरच्या खोऱ्यात हा समाज राहतो. म्यानमार आणि बांगलादेशींचं अनधिकृत वास्तव्य तिथे वाढत असल्याने या समाजाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कायद्यानुसार, मैती समाज मणिपूरच्या पठारावर वास्तव्य करू शकत नाही. त्यामुळे मैती समाजाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मैती समाजाला आदिवासी समाजात प्रविष्ट करण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. परंतु, राज्यातील आदिवासी समाजाने मैती समाजाला आपल्या प्रवर्गात समाविष्ट करून घेण्यास विरोध दर्शवला आहे. कारण, यामुळे हा समाज त्यांच्या जमीन आणि संसाधनांवर कब्जा मिळवेल.
मैती समाजाने याचिका दाखल करताच न्यायालयाने या मागणीवर विचार करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. तसंच, येत्या चार आठवड्यात न्यायालयात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयानंतर मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळला. विविध विद्यार्थी संघटनांनी ऑल ट्रायबल स्टुंडट युनियनअंतर्गत मणिपूरच्या सर्व १० जिल्ह्यांत मोर्चा काढला होता. या मोर्चात असंख्य लोक सहभागी झाले होते. हिंसाचार वाढू नये याकरता पुढील पाच दिवसांकरता येथील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. तर, काही भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.