Jammu Kashmir Accident : जम्मू-काश्मीरमधील रामबनमध्ये एका राष्ट्रीय महामार्गावर एका लष्करी वाहनाला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. लष्कराचा ट्रक ६०० फूट खोल दरीत कोसळल्याने ३ जवानांचा मृत्यू झाला आहे. लष्कराचा हा ट्रक जम्मूकडून काश्मीरच्या दिशेने येत असल्याचं सांगितलं जात आहे. रामबन जिल्ह्यात लष्करी जवानांना घेऊन जाणारा हा ट्रक रस्त्यावरून घसरल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

लष्कराच्या ट्रकचा अपघात घडल्यानंतर तातडीने स्थानिक पोलीस, लष्कर, एसडीआरएफ आणि सिव्हिल क्यूआरटीसह रामबन येथील स्थानिक स्वयंसेवकांनी बचाव कार्य सुरू केलं आहे. मात्र, या अपघातात ३ जवानांना जागीच मृत्यू झाला आहे, तर २ जवान गंभीर जखमी झाले असल्याचं वृत्त पीटीआयच्या हवाल्याने टाइम्स नाऊने दिलं आहे.

या अपघातात मृत्यू झालेल्या सैनिकांची ओळख पटली असून अमित कुमार, सुजीत कुमार आणि मान बहादूर असं या तीन जवानांचं नाव असल्याची माहिती आहे.वृत्तानुसार, त्यांचे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात येत आहेत. तसेच या अपघातात लष्कराच्या वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, जम्मूहून श्रीनगरला राष्ट्रीय महामार्ग ४४ वर लष्कराच्या वाहनाचा ताफा जात होता. मात्र, यातील एका लष्कराच्या ट्रकचे नियंत्रण सुटल्याने बॅटरी चष्माजवळ सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या अपघातात गाडीचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे.

दरम्यान, याआधी पूंछ जिल्ह्यात देखील अशाच प्रकारच्या अपघाताची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. लष्कराची एक गाडी ३५० फूट खोल दरीत कोसळली होती. त्यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची माहिती तेव्हा सांगण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा लष्कराचा ट्रक ६०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे.