भारताच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्याविरोधात व्हिसा गैरव्यवहार आणि सत्य माहिती लपविल्याप्रकरणी मॅनहॅटन येथील न्यायालयाने नव्याने आरोपपत्र दाखल करून घेत, अटक वॉरंट प्रसिद्ध केले आहे. यापूर्वी अमेरिकन न्यायालयाकडून देवयानी खोब्रागडे यांच्याविरुद्धचे सगळे आरोप रद्दबातल ठरवण्यात आले होते. मात्र, त्यांच्याविरोधात नव्याने आरोप ठेवण्याची मुभा न्यायालयाने फिर्यादी पक्षास दिली होती. त्यानुसार सरकारी वकिलांकडून नव्याने दाखल करण्यात आल्यानंतर देवयानी यांच्याविरूद्ध अटक वाँरंट जारी करण्यात आले आहे. या आरोपपत्रामध्ये देवयानी यांच्यावर मोलकरणीला ठराविक वेतनश्रेणीपेक्षा कमी वेतन दिल्याचा आणि शोषण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.     अमेरिकेचे ऍटर्नी प्रीत भरारा यांनी न्यायाधीश विल्यम पॉल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, देवयानी यांच्याविरुद्ध आजच्या दिवसात अटक वाँरंट जारी केले पाहिजे. त्यांच्या अटकेसंबंधीच्या आदेशाची माहिती भारताला लवकरात लवकर दिली पाहिजे. जेणेकरून देवयानी यांना अमेरिकन न्यायालयात हजर करण्याची तारीख निश्चित करण्यात येईल.
देवयानी खोब्रागडे यांना 12 डिसेंबरला अटक करण्यात आल्यानंतर त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली आली होती. त्यामुळे कडक आक्षेप नोंदवत भारताच्या अमेरिकेतील दुतावासांवर कडक निर्बंध आणले होते. देवयानी यांच्यावर त्यांची मोलकरीण संगीता रिचर्ड यांच्याकडून जास्त काम करून घेण्याचा व पगार कमी दिल्याचा आरोप आहे. भारताने देवयानी यांची अमेरिकेतून बदली करत संयुक्त राष्ट्र संघाच्या मिशनमध्ये सहभागी करून घेतले होते. त्यानंतर त्या भारतात परतल्या होत्या. सध्या त्या परराष्ट्र मंत्रालयात कार्यरत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrest warrant issued against devyani khobragade in us visa fraud case
First published on: 15-03-2014 at 11:13 IST