मूडीज या आर्थिक विश्वातील जगविख्यात संस्थेने भारताच्या मानांकनात सुधारणा केल्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटलींनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. ‘नोटाबंदीच्या निर्णयावर आणि जीएसटीच्या अंमलबजावणीवर टीका करणाऱ्या विरोधकांनी आत्मपरिक्षण करावे,’ असा टोला जेटलींनी लगावला. ‘भारताच्या आर्थिक परिस्थितीविषयी अनेकांना साशंकता होती. अर्थव्यवस्थेतील सुधारणांच्या प्रक्रियेबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न होते. त्यांनी आता गांभीर्याने आत्मचिंतन करण्याची गरज आहे,’ अशा शब्दांमध्ये जेटलींनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मूडीजकडून जगभरातील अर्थव्यवस्थांचा अभ्यास करुन त्याबद्दलचे मानांकन देण्यात येते. मूडीजने नुकताच याबद्दलचा अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये मूडीजने भारताच्या मानांकनात वाढ केली आहे. विशेष म्हणजे १३ वर्षांनंतर प्रथमच भारताच्या मानांकनात सुधारणा झाली आहे. मूडीजने भारताचे क्रेडिट रेटिंग ‘Baa3’ वरुन ‘Baa2’ केले आहे. मूडीजचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अरुण जेटलींनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर हल्लाबोल केला. नोटाबंदीच्या निर्णयावर टीकेची झोड उठवणाऱ्या आणि जीएसटीच्या अंमलबजावणीवरुन सरकारला कोंडीत पकडणाऱ्या विरोधकांवर जेटलींनी तोंडसुख घेतले.

‘सरकारने अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला. यामुळे अर्थव्यवस्था पारदर्शक झाली. अनेकजण कॅशलेस व्यवहारांकडे वळले. सरकारने अर्थव्यवस्थेला भक्कम करण्यासाठी घेतलेल्या निर्णयांचे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक झाले आहे. जागतिक पातळीवर नोटाबंदीच्या निर्णयाची सकारात्मक दखल घेण्यात आली आहे,’ असेही जेटली म्हणाले. ‘वस्तू आणि सेवा करामुळे कररचना सुटसुटीत झाली. जीएसटी लागू करण्याचा निर्णय भारताच्या आर्थिक सुधारणांमध्ये मैलाचा दगड ठरला. यामुळे कर व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल झाला. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे जगभरातून स्वागत होत आहे. नोटाबंदी, जीएसटी या आर्थिक सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला गती मिळाली आहे,’ असेही त्यांनी म्हटले.

मूडीजने भारताच्या मानांकनात केलेली वाढ ही मोदी सरकारने तीन वर्षांमध्ये केलेल्या कामाची उशीरा घेतलेली दखल असल्याचे मत यावेळी जेटलींनी व्यक्त केले. ‘मूडीजने मानांकनात केलेल्या सुधारणेचे आम्ही स्वागत करतो. मूडीजने आमच्या निर्णयांची आणि प्रयत्नांची उशीरा दखल घेतली आहे, असे आम्हाला वाटते. सरकारने घेतलेल्या निर्णयांचा देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होत असल्याचे यामधून दिसून आले आहे,’ असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arun jaitely slams oppositions after moodys rating upgrade says they seriously need to introspect
First published on: 17-11-2017 at 14:02 IST