पीटीआय, नवी दिल्ली

मोडीत काढण्यात आलेल्या दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित एका प्रकरणात चौकशीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल गुरुवारी सक्तवसुली संचालनालयापुढे (ईडी) हजर झाले नाहीत. ईडीने आपल्याला पाठवलेले समन्स ‘संदिग्ध, प्रेरित आणि कायद्याच्या दृष्टीने न टिकणारे’ असल्याचे सांगून ते परत घेण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली.

 अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केजरीवाल यांच्या या उत्तराची ईडी तपासणी करत आहे. या प्रकरणातील खटल्याची सुनावणी येत्या ६ ते ८ महिन्यांत पूर्ण केली जाईल या अभियोजन पक्षाच्या हमीची सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच नोंद घेतलेली असल्यामुळे, केजरीवाल यांना लवकरच नवे समन्स जारी केले जाण्याची शक्यता आहे.कथित दिल्ली उत्पादन शुल्क धोरणात चौकशी करण्यासाठी आणि आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यान्वये जबाब नोंदवण्यासाठी ईडीने केजरीवाल यांना बोलावले होते. मात्र,  केजरीवाल हे गुरुवारी मध्य प्रदेशातील सिंगरौली येथे जाणार असून तेथे रोड शोमध्ये सहभागी होणार असल्याचे आपकडून आधीच जाहीर करण्यात आले.ईडीचे समन्स ‘बेकायदेशीर, राजकीयदृष्टय़ा प्रेरित’ आणि आपल्याला निवडणूक होणार असलेल्या राज्यांमध्ये प्रचारापासून रोखण्याच्या उद्देशाने पाठवण्यात आले असल्याचा आरोप केजरीवाल यांनी ईडीच्या नोटिशीला दिलेल्या उत्तरात केला.  भाजपच्या आदेशावरून हे समन्स पाठवण्यात आल्याचाही आरोप केजरीवालांनी केला.

हेही वाचा >>>पत्नीने आयब्रोज केल्याने सौदीत बसलेला पती भडकला! व्हिडीओ कॉलवरच दिला तलाक

भाजपची केजरीवालांवर टीका

केजरीवाल हे सत्याला सामोरे जाऊ इच्छित नाहीत असे सांगून, उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित प्रकरणात ईडीच्या समन्सपासून ‘पळ काढल्याबद्दल’ भाजपने केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांना सत्याला सामोरे जायचे नाही, असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा पत्रकार परिषदेत म्हणाले. दुसरीकडे, दिल्लीमध्ये भाजपच्या नेत्यांनी केजरीवाल यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत निदर्शने केली.

राजकीय कारस्थान असल्याचा आपचा आरोप

अरिवद केजरीवाल यांना पाठवलेल्या समन्समागे ‘राजकीय कारस्थान’ असल्याचा दावा ‘आप’ने केला. या समन्समध्ये स्पष्टता नसल्याचे उत्तर केजरीवाल यांनी ईडीला दिले. केजरीवाल यांना अटक करण्यात येईल, असे भाजपचे खासदार मनोज तिवारी कसे म्हणू शकतात. याचाच अर्थ, हे राजकीय कारस्थान आहे, असे ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज म्हणाले.