लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या दिल्लीतील प्रचाराने आता वेग घेतला असून भाजप आणि आम आदमी पक्षामध्ये तुंबळ युद्ध सुरू झाले आहे. ‘दिल्ली, पंजाब, गुजरात, गोवा या राज्यांत ‘आप’ला मते देणारी जनता पाकिस्तानी आहेत का’, असा सवाल करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर पुन्हा शाब्दिक हल्लाबोल केला.

दिल्लीतील प्रचासभेत शहांनी, केजरीवाल व राहुल गांधी यांना भारतापेक्षा पाकिस्तानमधून जास्त पाठिंबा आहे. राहुल गांधी अनुच्छेद ३७० परत आणतील. नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) रद्द करतील. तिहेरी तलाकवरील बंदी उठवतील असा आरोप केला होता. त्यावर, ‘दिल्ली, पंजाब, गुजरात, गोव्यातील जनतेने ‘आप’ला मोठ्या संख्येने मतदान केले होते. हे मतदार पाकिस्तानी होते का? दिल्लीतील शहांच्या सभेत ५०० लोक देखील नव्हते. तिथे ते उद्दामपणे स्वत:च्या देशातील लोकांवरच शिवीगाळ करत होते’, अशी टीका केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत केली.

दिल्लीच्या जनतेने ६२ जागा जिंकून दिल्या, ५६ टक्के मते देऊन ‘आप’चे सरकार स्थापन केले. पंजाबच्या जनतेने आम्हाला ११७ जागांपैकी ९२ जागा मिळवून दिल्या. गुजरातमध्ये १४ टक्के मते ‘आप’ला मिळाली. गोवा, उत्तर प्रदेश, आसाम, मध्य प्रदेशसारख्या अनेक राज्यांतील लोकांनी आम्हावर विश्वास दाखवला. हे सगळे पाकिस्तानी आहेत का, असा सवाल केजरीवाल यांनी केला.

हेही वाचा >>>मोदींच्या भाषणांत विकासापेक्षाही काँग्रेस, ध्रुवीकरणाच्या मुद्द्यांवर जोर; पाच टप्प्यांत १११ भाषणे

पंतप्रधान मोदी पुढील वर्षी ७५ वर्षांचे होत असून त्यांचे वारसदार म्हणून अमित शहा पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसतील. त्यामुळे भाजपला मते देऊ नका, असे आवाहन केजरीवाल यांनी केले होते. त्यासंदर्भात केजरीवाल म्हणले की, शहा पंतप्रधान बनलेले नाहीत, त्याआधीच ते उद्दाम झालेले आहेत. पण, ते कधीही त्या खुर्चीवर बसू शकणार नाहीत. त्यामुळे शहांनी लोकांचा अपमान करणे बंद करावे!

‘भाजप आणि मोदी केंद्रात काही दिवसांचे पाहुणे आहेत. १ जून रोजी मतदानाचा अखेरचा टप्पा असून ४ जून रोजी मोदी सत्तेतून बाहेर गेलेले असतील. ‘इंडिया’ आघाडीला ३०० जागा मिळणार असून केंद्रात भाजपेतर सरकार स्थान स्थापन होईल’, असा दावा केजरीवाल यांनी केला. दिल्लीतील ७ जागांसाठी शनिवारी, २५ मे रोजी मतदान होत आहे.

योगी, मोदीशहांकडे लक्ष द्या!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही दिल्लीतील प्रचारसभेत केजरीवालांवर टीका केली होती. त्यावर, ‘भाजपमध्ये योगींचे खूप विरोधक आहेत. त्यांनी तिकडे लक्ष द्यावे. माझ्यावर आरोप करून काय मिळणार? योगींना मुख्यमंत्रीपदावरून हकालपट्टी करण्याचा मोदी-शहांचा डाव असून योगींनी त्यांच्याविरोधात लढाई करावी’, असा सल्लाही केजरीवाल यांनी दिला.