Arvind Kejriwal Nobel Prize Remark: आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोबेल पुरस्काराची इच्छा व्यक्त केली आहे. आप प्रमुख म्हणाले की, जोपर्यंत आमचे सरकार दिल्लीत सत्तेत होते तोपर्यंत आम्हाला काम करू दिले जात नव्हते, तरीही आम्ही काम केले. मुख्यमंत्री म्हणून मी दिल्लीत केलेल्या कामासाठी मला आणि आणि माझ्या प्रशासनाला नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे असे मला वाटते.
दरम्यान केजरीवाल यांनी ही इच्छा बोलून दाखवल्यानंतर भाजपाने त्यांची खिल्ली उडवली आहे. दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी अरविंद केजरीवाल यांच्या नोबेल पुरस्काराच्या वक्तव्यावर टीका केली आणि त्यांनी “मानसिक आरोग्य तपासणी” करून घ्यावी असे म्हटले आहे.
पंजाबमधील मोहाली येथे एका जाहीर सभेत बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, “तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आम आदमी पक्षाने असंख्य अडचणींचा सामना केल्यानंतर दिल्लीत मोहल्ला क्लिनिक बांधले. या लोकांनी त्यांचे बुलडोझर पाठवले आणि पाच मोहल्ला क्लिनिक पाडले. त्यांना यातून काय मिळाले?”
केजरीवाल पुढे म्हणाले, “आज दिल्लीतील लोकांना आम आदमी पक्षाचे महत्त्व समजत आहे. भाजपाने दिल्लीची अवस्था बिकट केली आहे. मोहल्ला क्लिनिक बंद होत आहेत. रुग्णालयांमध्ये मोफत औषधे आणि चाचण्या थांबल्या आहेत. सर्वत्र घाण पसरली आहे.”
“आमच्या सरकारच्या काळात आम्हाला काम करण्याची परवानगी नव्हती, तरीही आम्ही काम केले. यासाठी मला वाटते की, मला आणि माझ्या प्रशासनाला नोबेल पारितोषिक मिळायला हवे. उपराज्यपालांनी निर्माण केलेल्या सततच्या अडथळ्यांना न जुमानता आम्ही दिल्लीत इतके काम केले. ते अत्यंत आव्हानात्मक होते”, असे केजरीवाल आपल्या भाषणादरम्यान म्हणाले.
दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी अरविंद केजरीवाल यांच्या नोबेल पुरस्काराच्या पात्रतेच्या वक्तव्यावर टीका केली आणि ते म्हणाले की त्यांनी “मानसिक आरोग्य तपासणी” करून घेतली पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, “अरविंद केजरीवाल यांना भ्रष्टाचार, अराजकता आणि अकार्यक्षमतेसाठी नोबेल पुरस्कार मिळण्यास पात्र आहेत.”
वीरेंद्र सचदेवा म्हणाले, “जर भ्रष्टाचार, अराजकता आणि अकार्यक्षमतेसाठी नोबेल पुरस्कार असेल तरच तो त्यांना मिळू शकेल. अरविंद केजरीवाल यांनी मानसिक आरोग्य तपासणी करून घेतली पाहिजे.”