Arvind Kejriwal Sheesh mahal row : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपच्या पराभवानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढतानाच दिसत आहेत. केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) अरविंद केजरीवाल याचे सरकारी निवास्थान राहिलेल्या ६, फ्लॅगस्टाफ रोडवरील बंगल्यातील पुनर्बांधणीसाठी झालेल्या खर्चाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. या बंगल्याचा ‘शीशमहल’ असा उल्लेख करत भाजपाकडून या प्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

सीव्हीसीने केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाला (सीपीडब्लूडी) ४०,००० वर्ग यार्ड (८ एकर) मधील बंगल्याच्या बांधकामादरम्यान नियामांचे उल्लंघन करण्यात आल्याचे सांगण्यात आल्यासंबंधीच्या सर्व आरोपांची सविस्तर चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

भाजपा नेते विंजेंद्र गुप्ता यांनी तक्रार दिल्यानंतर सीपीडब्लूडीकडून अरविंद केजरीवाल यांच्या शासकीय मुख्यमंत्री निवासस्थानाबद्दल वस्तुस्थिती आधारित रिपोर्ट सादर केल्यानंतर सीव्हीसीने १३ फेब्रुवारी रोजी चौकशीचे आदेश दिले होते. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी विजेंद्र गुप्ता यांनी ६, फ्लॅगस्टाफ रोड येथील दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पूर्वीच्या निवासस्थानी अवैध बांधकाम केल्याप्रकरणी सीव्हीसीकडे तक्रार दाखल केली होती.

गुप्ता यांचे आरोप काय आहेत?

गुप्ता यांनी आरोप केला होता की केजरीवाल यांनी ४०,००० वर्ग यार्ड (८ एकर) मध्ये पसरलेल्या या भव्य इमारतीत बांधकाम करताना नियमांचे उल्लंघन केले आहे . केजरीवाल यांनी या शासकीय निवासस्थानाची पुनर्बांधणी करताना १० हजार चौरस मीटरचं बांधकाम ५० हजार चौरस मीटरपर्यंत वाढवलं. त्यासाठी आसपासच्या सरकारी जमिनीवर बेकायदेशीररीत्या अतिक्रमण केलं. त्यात ४५ व ४७ राजपूर रोडवरील ८ टाईप व्ही फ्लॅट आणि ८ए व ८बी फ्लॅगस्टाफ रोड हे बंगलेही त्यांनी अतिक्रमित केले.

दरम्यान सीव्हीसीने या प्रकरणात १६ ऑक्टोबर रोजी प्रकरणाच्या चौकशीसाठी अर्ज केला होता. नोव्हेंबर २०२४ रोजी सीव्हीसीने पुढील तपासासाठी सीपीडब्लूडीकडे पाठवले. भाजपा नेते विजेंद्र गुप्ता यांनी २१ ऑक्टोबर रोजी ६ फ्लॅगस्टाफ रोड वरील मुख्यमंत्री निवासात पुनर्बांधणी आणि इंटेरियर डेकोरेशनवर जास्तीचा खर्च केल्याप्रकरणी सीव्हीसीकडे औपचारिक तक्रार दाखल केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्य दक्षता आयुक्तांना दिलेल्या आपल्या तक्रारीत गुप्ता यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा देखील उपस्थित केला होता. ज्यामध्ये अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या घरात आलीशान सुविधा निर्माण करण्यासाठी करदात्यांचा कोट्यवधी रुपयांचा चुराडा केल्याचा आरोप करण्यात आला होता. ५ नोव्हेंबर रोजी सीव्हीसीने गु्प्ता यांच्या तक्रारीची दखल घेतली आणि आरोपांचे गांभीर्य मान्य केले. यानंतर ५ डिसेंबर रोजी विजेंद्र गुप्ता यांच्या तक्रारीवर आधारित फॅक्चुअल रिपोर्ट सीपीडब्लूडीच्या मुख्य दक्षता अधिकारी (सीव्हीओ)यांच्याकडून सीव्हीसीला सुपूर्द करण्यात आला.