स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आणि आरोपी आसाराम बापूची सून जानकीने त्याच्या मुलाविरुद्ध केलेल्या आरोपांप्रकरणी खजराना पोलीस ठाण्यात आपला जबाब नोंदवला असून, नारायण साईने आपल्या फसवल्याचा आरोप तिने केला आहे. या प्रकरणी नारायण साई आणि आसाराम बापू दोघांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी जानकीने पोलिसांकडे केली आहे. नारायण साईसोबत लग्न झाल्याचे आणि अन्य पुरावेही जानकीने पोलिसांकडे दिले आहेत.
नारायण साई आणि आसाराम बापूविरोधात जानकीने १९ सप्टेंबरलाच तक्रार दाखल केली होती. आपल्याशी लग्न केल्यानंतर नारायण साईने आश्रमातील एका महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले होते. ही महिला गर्भवती राहिल्यानंतर नारायण साईने तिच्याशी लग्न करण्याबद्दल आपल्याला सांगितले, असे जानकी यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मला घटस्फोट देऊन दुसरे लग्न करा, असे मी सांगितल्यावर नारायण साईने मला अंधारात ठेवून गुपचूपपणे संबंधित महिलेशी लग्न केल्याचा आरोपही तिने केला. यानंतर त्या दोघांना एक मूल झाल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.
याबद्दल आसाराम बापूला सर्व माहिती असताना त्यांनी शांत राहण्यासाठी माझ्यावरच दबाव टाकला, असाही आरोप तिने केला आहे. आसाराम बापूच्या प्रभावात येऊन आपले वडील देवराज कृष्णानी यांनी त्यांची मौल्यवान संपत्ती आसाराम बापूला दान केल्याचा दावा तिने केला आहे.