उत्तरप्रदेशातल्या लखीमपूर खेरी इथं झालेल्या हिंसाचाराप्रकरणी सध्या कारावासात असलेला केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला डेंग्यूची लागण झाली असल्याची माहिती समोर येत आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. मिश्रा याला उपचारासाठी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

याविषयी इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, आशिष मिश्रा पोलीस कोठडीत होता. त्याला शनिवारी संध्याकाळी कारागृहाच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आलं आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अरुण कुमार सिंग यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा.

आशिष मिश्रा याला इतर तिघांसह शुक्रवारी संध्याकाळी पुढील चौकशीसाठी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ४ शेतकऱ्यांसह आठ व्यक्ती उत्तरप्रदेशातल्या लखीमपूर खेरी इथं झालेल्या हिंसाचारात ३ ऑक्टोबर रोजी मारले गेले. शेतकरी आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांवर गाडी चढवल्याचा आरोप आशिष मिश्रावर आहे.

या हिंसाचाराप्रकरणी आत्तापर्यंत आशिष मिश्रासह १३ जणांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी मोहित त्रिवेदी, रिंकू राणा आणि धर्मेंद्र या तीन आरोपींना अटक करण्यात आली. तसंच संध्याकाळी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. तपासकर्त्यांनी चौकशीसाठी त्यांच्या १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. सोमवारी या अर्जावर सुनावणी होणार आहे.