Ashley St. Clair Claims She Is Mother Of Elon Musk Child: अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क सतत कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतात. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन अध्यक्षपदाची सूत्री हाती घेतल्यानंतर, त्यांचा दबदबा आणखी वाढला आहे. अशात एका प्रसिद्ध एन्फ्लुएन्सर तरुणीने पाच महिन्यांपूर्वी मस्क यांच्या बाळाला जन्म दिल्याचा दावा केला. याबाबत तरुणीची एक्स पोस्ट सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. हा दावा करणाऱ्या ३१ वर्षीय तरुणीचे नाव अ‍ॅशले सेंट क्लेअर असे आहे.

“पाच महिन्यांपूर्वी, मी…”

अ‍ॅशले सेंट क्लेअर या तरुणीने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, “पाच महिन्यांपूर्वी, मी या जगात एका बाळाचे स्वागत केले. एलॉन मस्क त्याचे वडील आहेत. माझ्या मुलाच्या प्रायव्हसी आणि सुरक्षिततेसाठी मी, याबाबत काहीही उघड केले नव्हते, परंतु टॅब्लॉइड मीडिया याबाबत वृत्त देणार असल्याचे समजल्यानंतर, काहीही नुकसान झाले तरी याबाबत माहिती देण्याचा निर्णय घेतला. मला माझ्या बाळाला सामान्य आणि सुरक्षित वातावरणात वाढवायचे आहे. या कारणास्तव, मी माध्यमांना विनंती करते की त्यांनी आमच्या बाळाच्या प्रायव्हसीचा आदर करावा आणि याबाबतचे आक्रमक वृत्तांकन टाळावे.” दरम्यान या दाव्याची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर युजर्स यावर प्रतिक्रिया देत आहेत.

मस्क यांना तीन महिलांपासून १२ अपत्ये

दरम्यान, अ‍ॅशले सेंट क्लेअरने केलेल्या या खळबळजनक दाव्यानंतर एलॉन मस्क यांनी आतापर्यंत यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, हा दावा खरा असेल तर, हे मस्क यांचे १३ वे अपत्य असेल. सार्वजनिक माहितीनुसार, एलॉन मस्क यांना तीन वेगवेगळ्या महिलांपासून एकूण ११ मुले आहेत. यापैकी दोन त्यांच्या पत्नी आहेत आणि एक त्यांच्या कंपनीत कर्मचारी आहे. ब्लूमबर्गच्या मते, १२ व्या मुलाचा गेल्या वर्षी जन्म झाला आहे. आतापर्यंत कोणालाही त्याच्याबद्दल काहीही माहिती नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोण आहे अ‍ॅशले सेंट क्लेअर?

अ‍ॅशले सेंट क्लेअरने ‘एलिफंट्स आर नॉट बर्ड्स’ हे पुस्तक लिहिले असून, यामुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती. या पुस्तकातून तिने रूढीवादी दृष्टिकोन मांडले आहेत. याचबरोबर ती बॅबिलोन बी या व्यंगचित्र संकेतस्थळासाठी देखील लेखन करते. याचबरोबर उजव्या विचारसरणीकडे कल असलेली अ‍ॅशले सेंट क्लेअरने सतत विविध विषयांवर आक्रमकपणे व्यक्त होत असते.