राजस्थानमध्ये काँग्रेसच्या एका मंत्र्याने मणिपूरमधील महिला अत्याचारावर न बोलता राजस्थानमधील महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर बोला म्हणत सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यानंतर या मंत्र्याची पदावरून उचलबांगडी करण्यात आली. राजेंद्र गुधा असं या काँग्रेस मंत्र्याचं नाव आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शुक्रवारी (२१ जुलै) गुधांना मंत्रीपदावरून हटवण्याचा निर्णय घेतला.

राजेंद्र गुधा यांच्याकडे पंचायत राज, ग्रामविकास, सैनिक कल्याण, होम गार्ड आणि नागरी सुरक्षा विभागाचं राज्यमंत्रीपद होतं. मात्र, सरकारमध्ये मंत्री असतानाही गुधा यांनी राजस्थानमधील महिलांच्या सुरक्षेवर गेहलोत सरकारला घेरलं. यानंतर त्यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात आली.

नेमकं काय घडलं?

शुक्रवारी राजस्थान विधीमंडळात राजस्थान किमान उत्पन्न हमी विधेयक २०२३ वर चर्चा सुरू होती. यावेळी काँग्रेस आमदारांनी मणिपूरमध्ये महिलांना विवस्त्र करून धिंड काढणे आणि सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी आंदोलन केलं. यावेळी राजेंद्र गुधा यांनी महिला सुरक्षेवरून आपल्याच पक्षाच्या सरकारला प्रश्न विचारले.

हेही वाचा : ‘आमची तुलना मणिपूरमधील तुमच्या अपयशाशी करू नका’, राजस्थान, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे मोदींना प्रत्युत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुधा म्हणाले, “राजस्थानमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सरकार महिलांना सुरक्षा पुरवण्यात अपयशी ठरलं आहे. मणिपूरच्या महिलांवरील अत्याचारावर बोलण्याऐवजी आपण आत्मपरिक्षण केलं पाहिजे.”