अफगाणिस्तानात अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील दुसऱ्या मोजणीचे प्राथमिक कल हाती आले असून त्यात अशरफ घनी हे आघाडीवर आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, घनी यांना आतापर्यंत सर्वाधिक मते मिळाली आहेत. २८ सप्टेंबरला अध्यक्षीय निवडणुकीसाठी मतदान झाले होते त्यातही घनी यांनाच आघाडी मिळाली होती, पण त्यानंतर मुख्य कार्यकारी व त्यांचे प्रतिस्पर्धी अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी त्या निकालास आव्हान दिले होते, त्यामुळे मतमोजणीची दुसरी फेरी घेण्यात आली.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार घनी यांना सप्टेंबरमध्ये ५०.६४ टक्के, तर अब्दुल्ला यांना ३९.५२ टक्के मते मिळाली होती. अजूनही अंतिम निकाल जाहीर करेपर्यंत संबंधित उमेदवारांना निकालाबाबत हरकती घेऊन तक्रारी करण्याची संधी आहे. आताचे निकाल जाहीर झाल्यानंतरही अब्दुल्ला यांनी या निकालास आव्हान देणार असल्याचे जाहीर केले आहे. ‘आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही हा निकाल मान्य करणार नाही, असे आम्ही आंतरराष्ट्रीय समुदाय, लोक, समर्थक व निवडणूक आयोग यांना सांगू इच्छितो कारण या निवडणुकीत गैरप्रकार बरेच आहेत.’ असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.  प्राथमिक निकाल १९ ऑक्टोबपर्यंत अपेक्षित होते, पण त्याला तांत्रिक कारणास्तव विलंब करण्यात आला त्यामुळे अब्दुल्ला यांच्यासह काही उमेदवारांनी गैरप्रकाराचे आरोप केले होते.

निवडणूक आयोगाच्या प्रमुख हवा आलम नुरीस्तानी यांनी सांगितले की, आम्ही प्रामाणिकपणे आमचे कर्तव्य पार पाडले आहे. आम्ही प्रत्येक मताचा आदर राखला आहे.

बायोमेट्रिक मतदान यंत्रे

दरम्यान अफगाणिस्तानात सध्या तालिबान व अमेरिका चर्चेतील अनिर्णितता व देशातील निवडणुकांतील घोळ यामुळे राजकीय अस्थिरता आहे. तेथील निवडणुकीत जर्मन बनावटीची बायोमेट्रिक मतदान यंत्रे वापरण्यात आली होती. त्यामुळे एकाच मतदाराने पुन्हा बोगस मतदान करण्याची शक्यता टाळण्यात आली होती. सुरुवातीच्या २७ लाख मतांतील १० लाख मते गैर असल्याचा दावा करण्यात आल्याने ती बाद ठरवण्यात आली. त्यामुळे निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी खाली आली आहे.