Aspiring model Arrested for Murder in Navi Mumbai : सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स असलेला हरियाणातील कॉन्टेंट क्रिएटर सुखप्रीत सिंह उर्फ सुख रतिया वाला याला मुंबई पोलीस व नोएडा एसटीएफने केलेल्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे. पाच लाख रुपयांची सुपारी घेऊन नवी मुंबईत एका महिलेचा खून केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या खून प्रकरणात सुखप्रीतच्या मामाचा मुलगा गुरप्रीत सिंह देखील सामील होता. त्याला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सुखप्रीतचे इन्स्टाग्रामवर पाच लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. तो मॉडेलिंग करण्यासाठी मुंबईत आला होता. मात्र, पैशांसाठी त्याने सुपारी घेऊन एका महिलेचा खून केल्याचं समोर आलं आहे. सुखप्रीत सिंह हा सोशल मीडियावर फॅशनशी संबंधित व्हिडिओ बनवून शेअर करत होता.

पैशांसाठी गुन्हेगारीचा मार्ग निवडला

सुखप्रीत हा मूळचा हरियाणामधील फतेहबाद जिल्ह्यातील रतिया या शहरातील रहिवासी आहे. तो सुरुवातीला शिवराळ भाषेतील व्हिडीओ बनवून फेसबूक व इन्स्टाग्रामवर शेअर करत होता. या व्हिडीओंमुळे त्याला रतियासह हरियाणात लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्याने मॉडेलिंगचा व्यवसाय सुरू केला. मात्र, पंजाबमधील एका तरुणीशी झालेल्या वादानंतर २०२२ मध्ये तो हरियाणा सोडून मुंबईत पळून आला. मुंबईत तो मॉडेलिंग करून पैसे कमावण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, सातत्याने येणारं अपयश व आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी त्याने गुन्हेगारीचा मार्ग निवडला.

उत्तर प्रदेशमधील एक महिला जिचं मुंबईत ब्युटी पार्लर आहे तिने सुखप्रतीला ५ लाख रुपयांची हत्येची सुपारी मिळवून दिली. त्यानंतर त्याने नवी मुंबईत एका महिलेचा खून केला आणि फरार झाला. मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पतीनेच खुनाची सुपारी दिली होती

सुखप्रीतने १८ मे २०२५ रोजी नवी मुंबईतील एक २७ वर्षीय महिला अल्विना आदम अली खान हिची भर रस्त्यात गळा चिरून हत्या केली. पोलिसांनी या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज मिळवलं असून त्यात मुखवटा लावून आलेल्या दोन तरुणांनी ही हत्या केल्याचं स्पष्ट दिसत आहेत. अल्विनाचा पती किशोर सिंह यानेच सुखप्रीतला या हत्येची सुपारी दिली होती असं पोलीस चौकशीत समोर आलं आहे.

खुनाचं गाझियाबाद कनेक्शन

किशोर आणि अल्विनामध्ये खूप भांडणं होत होती. त्यामुळे त्याला तिच्यापासून सुटका हवी होती. त्यानंतर गाझियाबादमधील अलिशा त्यागी व पंजाबमधील चरणजीत कौर उर्फ डिंपल यांच्या मदतीने किशोरने सुखप्रीतशी संपर्क साधला आणि त्याला सुपारी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चार जण अटकेत

दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत या हत्येप्रकरणी अल्विनाचा पती व सुपारी देणारा किशोर सिंह, अलिशा त्यागी, चरणजीत कौर, सुखप्रीत सिंग व गुरप्रीत सिंह या चौघांना अटक केली आहे. हत्येनंतर सुखप्रीत व गुरप्रीत दोघेही नोएडात लपून बसले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी नोएडा एसटीएफच्या मदतीने संयुक्त कारवाई करत दोन्ही गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम १०३ (१) व ६१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.