सीता मातेला पळवून नेण्यासाठी रावण भगवे कपडे घालून आला होता, आता योगी आदित्यनाथ भगवे कपडे घालून येतात. ते चीनच्या सीमेवरील अतिक्रमणावर, महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर अवाक्षर काढत नाहीत, असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना केले होते. या विधानानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – “निवडणूक आयोगाच्या चुकांमुळे मतदानाची टक्केवारी कमी”; नाना पटोलेंचा थेट आरोप; म्हणाले, “पहिल्या टप्प्यानंतर…”

काय म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा यांनी नाना पटोले यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. “चीनने भारताची कोणतीही जमीन बळकावलेली नाही. भारताच्या कोणत्यांनी भागावर चीनने अतिक्रमण केलेलं नाही. जर नाना पटोले यांना असं वाटत असेल तर मी त्यांना चीनच्या सीमेवर घेऊन जायला तयार आहे. त्यांनी चीनच्या सीमेवर जावं आणि बघून यावं”, असे ते म्हणाले.

भाजपाचे नाना पटोलेंना प्रत्युत्तर

काँग्रेससह इंडिया आघाडीला भगव्या रंगाचा द्वेष आहे. त्यांना सनातन धर्माचा द्वेष आहे. याच काँग्रेसनेच भगवा आंतकवाद असा शब्द पुढे आणला होता. खरं तर पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर जनतेने आपल्याला नाकारलं, याची जाणीव त्यांना झाली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना नैराश्य आलं आहे. त्यातूनच अशा प्रकारची विधानं केली जात आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रवक्ते मनिष शुक्ला यांनी दिले.

हेही वाचा – “शरद पवारांना आता १० वर्षांनी जाग आली का?” ‘त्या’ टीकेला अण्णा हजारेंचं प्रत्युत्तर!…

नाना पटोलेंनी नेमकं काय म्हटलं होतं?

दरम्यान, नाना पटोले यांनी काल योगी आदित्यनाथ यांची तुलना रावणाशी केली होती. “रावण सीता मातेला पळवून नेण्यासाठी भगवे कपडे घालून आला होता. आता योगी आदित्यनाथ भगवे कपडे घालून येत आहेत.” असं ते म्हणाले होते. पटोले यांनी आदित्यनाथ यांच्या राजकीय वक्तव्यांवर आक्षेप घेतला होता. तसेच “योगी आणि भाजपा नेते केवळ काँग्रेसवर टीका करत आहेत. मात्र देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर, चीनचं सीमेवरील अतिक्रमण, महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर अवाक्षर काढत नाहीत.”, अशी टीकाही त्यांनी केली होती.