‘‘अवकाश क्षेत्रासंबंधी संपूर्ण चित्र बदलत असून, भविष्य उज्ज्वल आहे,’’ असे मत अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी सोमवारी व्यक्त केले. आपल्या यशामागे दीर्घ काळ केलेले कष्ट आहेत, असेही ते म्हणाले.

‘ॲक्सिऑम-४’ या यशस्वी अवकाश मोहिमेनंतर शुक्ला सोमवारी प्रथमच लखनऊमध्ये त्यांच्या घरी आले. भारतामध्ये ते १७ ऑगस्ट रोजी आले. मात्र, नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसह विविध ठिकाणी त्यांनी कार्यक्रमांना उपस्थिती लावली. सोमवारी लखनऊमध्ये आल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

शुभांशू ज्या शाळेत शिकले, त्या ‘सिटी माँटेसरी स्कूल’ येथील मुलांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘गेल्या पाच वर्षांतील माझे प्रशिक्षण आणि गेल्या एक वर्षातील माझे अवकाशात प्रत्यक्ष उड्डाण यातून अवकाश क्षेत्रातील बदल माझ्या लक्षात आले.” आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून पृथ्वीवर परत आल्यानंतर प्रत्येक क्षणागणिक माझा उत्साह वाढत आहे. प्रत्येकाने या ठिकाणी दाखविलेला उत्साह माझ्यासाठी ऊर्जा वाढविणारा आहे. तुमच्यातील हा उत्साह कमी होता कामा नये, असे शुभांशू म्हणाले.

‘‘अवकाशात असताना तीन विविध स्तरांवर मुलांशी माझा संवाद झाला. पण, कुणीही मला मी किंवा अंतराळवीर अवकाशात काय करतात, हे विचारले नाही. मी अंतराळवीर कसा झालो, हेच साऱ्यांनी विचारले. यातून विचार करण्याची पद्धत दिसते. २०४० पर्यंत आपल्याला चंद्रावर जायचे आहे. आपले उद्दिष्ट मोठे आहे. तुमच्यापैकीच एखादा विद्यार्थी कदाचित उद्याचा अंतराळवीर असेल आणि तो चंद्रावर जाईल.’’ अंतराळवीर होणे सोपे नसल्याचेही शुक्ला म्हणाले.

लखनऊत भव्य स्वागत

शुक्ला यांचे लखनऊत भव्य स्वागत करण्यात आले. विमानतळापासून एका खुल्या वाहनामधून मोठा रोड-शो झाला. त्यांचे स्वागत करण्यासाठी दुतर्फा लोक उभे होते. पावसाच्या हलक्या सरी असल्या, तरी विद्यार्थी, नागरिकांची गर्दी होती. उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक हेदेखील स्वागतामध्ये सहभागी झाले होते. ‘‘माझे दिल्लीतही स्वागत करण्यात आले. पण, इथल्याची सर त्याला येणार नाही. घरी आल्याचा मला खूप आनंद होत आहे,’’ असे शुक्ला म्हणाले. त्यांच्याबरोबर व्यासपीठावर त्यांचे वडील शंभू शुक्ला, आई आशा उपस्थित होते.

अवकाश क्षेत्रातील चित्र व्यापक स्तरावर बदलत असून, भविष्य उज्ज्वल आहे. आत्ताची वेळ योग्य आहे आणि संधीही आहेत. – शुभांशू शुक्ला, अंतराळवीर