रोम : इटलीच्या दक्षिण तटवर्ती भागात रविवारी खवळलेल्या सागरात स्थलांतरितांची लाकडी नौका फुटून झालेल्या दुर्घटनेत ५९ जणांचा मृत्यू  ओढवला आहे.  यात १२ मुलांचा समावेश आहे. मृतांची संख्या आणखी वाढू शकते, अशी माहिती इटलीच्या अंतर्गत मंत्री वॉन्डा फेरो यांनी  दिली.  

 सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीने स्थानिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, सकाळपर्यंत ३३ मृतदेह बाहेर काढण्यात आले होते, तसेच आतापर्यंत ८१ जणांना वाचविण्यात यश आले आहे. मृतांत काही महिन्यांच्या एका बाळाचा समावेश असल्याचे इटलीच्या एजीआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. 

या दुर्घटनेसंबंधी आरएआय या सरकारी रेडिओने वृत्त दिले आहे. कॅलाब्रिया प्रांतातील किनारपट्टीवरील क्रोटोन या शहरातील बंदर अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या या वृत्तात म्हटले आहे की, या नौकेत शंभरहून अधिक स्थलांतरित होते. आयोनियन समुद्रात भल्या पहाटे ही नौका फुटली. इटालीच्याच लॅप्रेसे या वृत्तसंस्थेने बचाव मोहिमेतील अधिकाऱ्यांचा हवाला देत म्हटले आहे की, या नौकेत सुमारे १८० लोक असावेत. सरकारी दूरचित्रवाहिनीच्या वृत्तात म्हटले आहे की, दुर्घटनेनंतर २७ प्रवासी पोहून किनाऱ्यावर आले. ही दुर्घटना ज्या ठिकाणी झाली त्या नजीकच्या स्टेकॅटो डी कुट्रो या किनाऱ्यावर फुटलेल्या नौकेचे लाकडी अवशेष दिसून आले. तीन मृतदेह याच ठिकाणी वाहून आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नौका कुठली? दुर्घटनाग्रस्त नौका कोणत्या ठिकाणाहून निघाली होती प्रारंभी स्पष्ट झाले नव्हते. पण, ही नौका तुर्कस्तानमधून निघाली होती आणि तीमध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान, सोमालियातील स्थलांतरित, निर्वासित होते, असे नंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. कॅलाब्रिया येथे पोहोचणाऱ्या स्थलांतरितांच्या नौका या प्रामुख्याने तुर्कस्थान किंवा इजिप्तच्या किनाऱ्यावरून सुटतात. या पैकी अनेक नौका, होडय़ा इटलीच्या दक्षिणेकडील निर्मनुष्य किनाऱ्याला लागलात. त्यांना तटरक्षकांची किंवा अन्य कोणतीही मानवी मदत मिळत नाही.  क्रोटोनचे महापौर विन्सेन्झो व्होस यांनी आरएआय टीव्हीला सांगितले की, माणुसकीच्या दृष्टिकोनातून दुर्घटनेतील मृतदेहांवर आमच्या स्मशानभूमींत अंत्यसंस्कार केले जातील.