Fact Check on Fake News WhatsApp Message over India Pakistan Tension : पहलगाममच्या हल्ल्याविरोधात भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले असून भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव दिवसागणिक तीव्र होत असताना सामान्य नागरिकांचीही फेक न्यूजविरोधात लढाई सुरू आहे. पुढचे काही दिवस एटीएम बंद असणार असल्याचा मेसेज सध्या व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहे. याबाबत पीआयबी फॅक्ट चेकने महत्त्वाची माहिती दिली आहे.
पाकिस्तानविरोधात युद्धादरम्यान सायबर अटॅक होण्याची शक्यता असल्याने पुढचे २ ते ३ दिवस एटीएम सेवा बंद राहणार आहे, असं या व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं आहे. तसंच, आज कोणतेही ऑनलाईन व्यवहार करू नका. आज डान्स ऑफ दि हिलरी नावाने आलेला व्हिडिओ कॉलही उचलू नका. हा व्हायरस असून यामुळे तुमचा मोबाईल फॉरमॅट होऊ शकतो. हे अत्यंत धोकादायक असून आज बीबीसी रेडिओवर जाहीर करण्यात आल्याचंही या मेसेजमध्ये म्हटलं आहे. हा Ransomeware अटॅक असून यामध्ये ७४ देश बाधित झाले आहेत. तसंच, tasksche.exe असे शब्द असलेले इमेलही ओपन करू नका, असेही आवाहन यातून करण्यात आले आहे. मात्र हा मेसेज फेक असल्याचं पीआयबी फॅक्ट चेकने स्पष्ट केलं आहे.
हा मेसेज फेक असून एटीएम नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत. त्यामुळे असे मेसेज शेअर न करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
चुकीचे व्हिडिओ आणि फोटोही व्हायरल
इतकेच नाही तर भारत आणि पाकिस्तान यांच्याकडून होणाऱ्या हल्ल्यांसंबधीचे बनावट व्हिडीओ आणि फोटो शेअर करत चुकीचे दावे केले जात आहेत. या संपूर्ण प्रकार रोखण्यासाठी आणि खोटी माहिती पसरू नये या पार्श्वभूमीवर सरकारकडून काही उपाय योजना केल्या जात आहेत. याचाच भाग म्हणून सरकारने नागरिकांना फेक न्यूज बद्दल जागृत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
तुम्हाला सोशल मीडियावर एखादी चुकीची माहिती देणारी बातमी किंवा फोटो, व्हिडीओ आढळून आल्यास याबद्दल आता तक्रार करत येणार आहे. राज्य सरकारडून अशा ‘फेक न्यूज’बद्दल तक्रार करण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेककडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.