दुर्गापूजा उत्सवादरम्यान बांगलादेशातील हिंदूंवर झालेले हल्ले हे अल्पसंख्याकांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी रचलेला नियोजित कट होता. त्यामुळे भारत सरकारने आपल्या शेजारी देशाशी संपर्क साधून ढाका येथे अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले थांबतील, याची खात्री करावी असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले आहे. आरएसएसच्या तीन दिवसीय अखिल भारतीय कार्यकारिणी समितीच्या बैठकीत मंजूर झालेल्या ठरावाबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना, संघाचे संयुक्त सरचिटणीस अरुण कुमार म्हणाले की, “बांगलादेश सरकारने हल्ले घडवून आणणाऱ्या घटकांविरुद्ध लोकांविरोधात कठोर कारवाई करावी आणि गुन्हेगारांना कडक शिक्षा मिळावी, अशी मागणी संघाने केली आहे.”

“बांगलादेशातील हिंदूंवर झालेला हल्ला हा अल्पसंख्याकांना नेस्तनाबूत करण्याचा आणि उखडून टाकण्यासाठी रचलेला कट आहे. या हल्ल्याचा उद्देश बनावट बातम्यांद्वारे धार्मिक संघर्ष निर्माण करणे हा होता. बांगलादेश सरकारशी संवाद साधण्यासाठी केंद्राने आपले सर्व राजनैतिक मार्ग उघडावेत आणि तेथील सरकारला हिंदू आणि बौद्धांवर होणारे हल्ले थांबविण्यास सांगावे,” असे कुमार म्हणाले. शिवाय, या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्र आणि इतर मानवाधिकार संघटनांनी बाळगलेले मौन हे त्यांच्या दुटप्पी भूमिकांचे प्रदर्शन करते,” असा आरोप त्यांनी केला.

बांगलादेशमध्ये काय घडलं?

बांगलादेशात दुर्गापूजा उत्सवादरम्यान हिंदू मंदिरांचा विध्वंस करण्यात आल्याच्या घटना घडल्या. त्यानंतर समाजमाध्यमावरील एका कथित ईश्वरनिंदात्मक पोस्टच्या मुद्यावर जमावाने बांगलादेशातील हिंदूंच्या ६६ घरांचे नुकसान केले गेले. तसेच हिंदूंची किमान २० घरे पेटवून देण्यात आली होती. शंभरहून अधिक लोकांच्या जमावाने जाळपोळ करण्याची ही घटना रंगपूर जिल्ह्याच्या पीरगंज उपजिल्ह्यातील एका खेड्यात घडली होती.