पाच संशयित आरोपींना अटक
आफ्रिकी नागरिकांवर नव्याने हल्ल्याच्या घटना सामोऱ्या आल्यानंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या नागरिकांच्या संरक्षणासाठी गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याशी संपर्क साधला. गृहमंत्र्यांनीही लगेचच हल्लेखोरांना ताब्यात घेण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना दिले आहेत. या हल्ल्यांच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांना कडक कारवाईचे तसेच आफ्रिकी लोकांचे वास्तव्य असलेल्या भागात गस्त वाढवण्याचे आदेश द्यावेत, असे स्वराज यांनी राजनाथ सिंग यांना सांगितले होते. याप्रकरणी बाबू , ओमप्रकाश, अजय व काहुल यांना अटक करण्यात आली असून पाचवा आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला ताब्यात घेतले आहे.
श्रीमती स्वराज यांनी सांगितले, की आफ्रिकन नागरिक राहत असलेल्या भागात संवेदनशीलता कार्यक्रम राबवला जाईल. श्रीमती स्वराज यांनी परराष्ट्र राज्य मंत्री व्ही.के.सिंग व परराष्ट्र कामकाज खात्याचे सचिव अमर सिन्हा यांना आफ्रिकी विद्यार्थ्यांची भेट घेण्यास सांगितले आहे. मंगळवारी जंतरमंतर येथे आफ्रिकी विद्यार्थी धरणे आंदोलन करणार आहेत. दरम्यान, दिल्ली पोलिसांचे दक्षिण विभाग उपायुक्त ईश्वर सिंग यांनी सांगितले, की दक्षिण दिल्लीत मेहरौली भागात हल्ला करणाऱ्या दोन जणांना अटक केली असून इतर तीन जणांना ताब्यात घेतले आहे. हल्ल्याच्या घटनांमध्ये सहा आफ्रिकी व्यक्ती जखमी झाल्या आहेत. मोठय़ाने संगीत लावणे व सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे यातून मारामारीचे प्रकार घडले आहेत. गेल्या आठवडय़ात दक्षिण दिल्लीत वसंतकुंज येथे कांगोचा नागरिक एम.के.ऑलिव्हर याचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. आफ्रिकी देशांच्या दूतावासांनी गुरुवारी या ऑलिव्हर याच्या खुनाबाबत तीव्र प्रतिक्रिया दिली होती. दक्षिण आफ्रिकेची एक व युगांडाची एक महिला तसेच नायजेरियाच्या दोन पुरुषांनी त्यांच्यावर हल्ला झाल्याची तक्रार दिली आहे. काँगोच्या नागरिकाचा मृतदेह मायदेशी पाठवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.