सीमेपलीकडून पसरवल्या जाणाऱ्या दहशतवादाचा भारत व अमेरिका यांनी निषेध केला असून संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी ठरवलेल्या गटांसह सर्वच गटांवर कारवाई करण्यात येईल, असे संयुक्त निवेदनात म्हटले आहे. मुंबईत २६ नोव्हेंबर २००८  रोजी झालेल्या हल्ल्यात सामील दहशतवाद्यांना न्यायासनासमोर आणून कठोर शिक्षा करण्याची गरजही या वेळी प्रतिपादन करण्यात आली.

पंतप्रधान मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी द्विपक्षीय चर्चा केल्यानंतर जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, की अमेरिका व भारत हे जागतिक दहशतवादाच्या विरोधात ठामपणे उभे आहेत. दोन्ही नेत्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळ ठराव १२६७ अन्वये दहशतवादी गटांवर कारवाई करण्याबाबत वचनबद्धता दाखवली आहे.

संयुक्त निवेदनात म्हटले आहे, की सीमेपलीकडून पसरवल्या जाणाऱ्या दहशतवादाचा दोन्ही देश निषेध करीत असून २६ नोव्हेंबर २००८  रोजी मुंबईत करण्यात आलेल्या हल्ल्यात सामील असलेल्या दहशतवाद्यांना न्यायासनासमोर आणून शिक्षा क रण्यासाठी प्रयत्न केले जातील. याशिवाय दहशतवादी गटांचा रसद पुरवठा, आर्थिक मदत व लष्करी पाठिंबा काढून घेण्याची गरज या वेळी व्यक्त करण्यात आली.

पाकिस्तानच्या जमात उद दवाचा दहशतवादी हाफीज सईद हा लष्कर ए तय्यबाने २००८ मध्ये मुंबईत केलेल्या हल्ल्याचा सूत्रधार होता.  सईद याला संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी घोषित केलेले असून त्याच्यावर १ कोटी डॉलर्सचे इनाम आहे.

 सध्या तो लाहोर येथील कोटलखपत तुरुंगात आहे. लष्कर ए तय्यबा, जैश ए महंमद व अफगाणिस्तानचे हक्कानी नेटवर्क यांना संयुक्त राष्ट्रांच्या ठराव १२६७ अन्वये दहशवादी गट ठरवण्यात आले आहे. याशिवाय आयसिल दाएश, अल कायदा तसेच इतर गटांचाही त्यात समावेश आहे.