मेलबर्न : ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी लेबर पक्षाची पुन्हा विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू आहे. त्यामुळे अँथनी अल्बानीज यांना सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान मिळणार आहे. गेल्या २१ वर्षांत ही कामगिरी करणारे ते पहिलेच नेते ठरले आहेत.

विरोधी पक्षाचे नेते पीटर डटन यांनी शनिवारी मतदारांचा कल स्पष्ट झाल्यावर आपला पराभव मान्य केला. ‘‘आम्ही प्रचार करण्यात कमी पडलो आणि मी याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारतो,’’ असे ते म्हणाले. तसेच हा लेबर पक्षासाठी ऐतिहासिक प्रसंग असल्याची प्रतिक्रिया त्यांनी मान्य केले आणि अल्बानीज यांचे अभिनंदन केले.

ऑस्ट्रेलियाच्या ‘इलेक्टोरल कमिशन’ने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, पार्लमेंटच्या १५० सदस्यीय ‘हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह’मध्ये अल्बानीज यांच्या मध्यममार्गी डाव्या विचारसरणीच्या लेबर ७० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर पुराणमतवादी विरोधी पक्षांच्या आघाडीला २४ जागा मिळण्याची अपेक्षा आहे. त्याशिवाय कोणाशीही युती न केलेले लहान पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना मिळून १३ जागा मिळण्याची शक्यता आहे. ‘ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्प’चे निवडणूक विश्लेषक अँटनी ग्रीन यांनी लेबर पक्षाला ७६, विरोधी आघाडीला ३६ आणि लहान पक्ष व अपक्षांना १३ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वरून अँथनी अल्बानीज यांचे ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी पुन्हा निवड झाल्याबद्दल केले. भारत-ऑस्ट्रेलिया सर्वंकष सामरिक भागीदारी अधिक दृढ करण्याची आपल्याला आशा आहे, असे त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

प्रचारातील प्रभावी मुद्दे

ऊर्जा धोरण आणि महागाई हे प्रचारातील महत्त्वाचे मुद्दे होते. ऑस्ट्रेलियाच्या नागरिकांना वाढत्या दैनंदिन खर्चाची समस्या भेडसावत असल्याचे दोन्ही बाजूंनी मान्य करण्यात आले होते. डटन यांच्या पुराणमतवादी लिबरल पक्षाने वाढती महागाई आणि वाढते व्याजदर यासाठी सरकारला जबाबदार ठरवले होते. सरकारी खर्च कमी करण्यासाठी वीस टक्के सार्वजनिक नोकऱ्यांची कपात करण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते. अन्नसुरक्षा, घरांचा तुटवडा, चीनबरोबरचे संबंध, हरितगृह वायूंचे उत्सर्जन, बदलती लोकसांख्यिकी हे मुद्देही महत्त्वाचे ठरले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमचे सरकार पारंपरिक मार्ग निवडेल कारण आम्हाला आमचा आणि आम्ही उभारलेल्या राष्ट्राचा अभिमान आहे. आम्हाला कोणाकडूनही भीक मागण्याची किंवा उधार घेण्याची किंवा नक्कल करण्याची गरज नाही. आम्हाला परदेशातून प्रेरणा घेण्याची गरज नाही. आमच्या प्रेरणा आमची मूल्ये आणि आमची जनता आहे.– अँथनी अल्बानीज, पंतप्रधान, ऑस्ट्रेलिया