Iran Warns US: इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी झाल्यानंतरच्या पहिल्याच भाषणात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी म्हणाले की, भविष्यात अमेरिकेच्या हल्ल्यांना मध्यपूर्वेतील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ला करून प्रत्युत्तर दिले जाईल.
इराण कधीही अमेरिकेसमोर शरणागती पत्करणार नाही आणि भविष्यात होणाऱ्या हल्ल्याची त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल, असे इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदीनंतरच्या त्यांच्या पहिल्याच भाषणात अयातुल्ला अली खामेनी यांनी म्हटले आहे.
अमेरिकेने इराणमधील तीन अणु प्रकल्पांना लक्ष्य केले होते. त्यानंतर याला प्रत्युत्तर म्हणून इराणने कतारमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ले केल्यानंतर इराण-इस्रायल यांच्यात युद्धबंदी झाली.
“अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या एका विधानात सूचित केले होते की, इराणने शरणागती पत्करावी. शरणागती पत्करावी! हा आता समृद्धीचा किंवा अणुउद्योगाचा प्रश्न नाही, तर इराणच्या शरणागतीचा प्रश्न आहे. अशी गोष्ट (शरणागती) कधीही घडणार नाही,” असे खामेनी आपल्या भाषणात म्हणाले.
कतारमधील अमेरिकेच्या अल उदेद हवाई तळावर इराणने केलेल्या हवाई हल्ल्याचा संदर्भ देताना खामेनी म्हणाले, “इराणला या प्रदेशातील प्रमुख अमेरिकन केंद्रांपर्यंत प्रवेश आहे आणि जेव्हा आवश्यक वाटेल तेव्हा आम्ही कारवाई करू शकतो, ही एक महत्त्वाची बाब आहे. भविष्यातही अशी कारवाई पुन्हा होऊ शकते. जर कोणताही हल्ला झाला, तर शत्रूला निश्चितच मोठी किंमत मोजावी लागेल.” याबाबत खामेनी यांच्या एक्स पोस्टमध्येही उल्लेख करण्यात आला आहे.
“इराणचे शत्रू क्षेपणास्त्रे किंवा आमच्या अणु कार्यक्रमासारखी कारणे सांगतात, पण प्रत्यक्षात त्यांना वाटते की आम्ही शरणागती पत्करावी. ट्रम्प यांनी हे सत्य उघड केले आहे की अमेरिका फक्त इराणच्या शरणागतीनेच समाधानी होईल. पण आम्ही कधीही शरणागती पत्करणार नाही, आमचा देश शक्तिशाली आहे,” असेही खामेनी म्हणाले.
दरम्यान, १२ दिवस चाललेल्या इराण-इस्रायल युद्धात गेल्या रविवारी अमेरिकेनेही सहभाग घेतल्यानंतर तणाव आणखी वाढला होता. रविवारी अमेरिकेने इराणच्या तीन अणु प्रकल्पांवर हल्ले केले होते. अमेरिकेने या आक्रमक ऑपरेशनला ‘मिडनाईट हॅमर’ असे नाव दिले होते. यानंतर इराणनेही आक्रमक भूमिका घेत अमेरिकेच्या मध्यपूर्वेतील लष्करी तळांवर हल्ले केले होते.