दिवाळीनिमित्त अयोध्या नगरी ५ लाख ५१ हजार दिव्यांच्या रोषणाईने झगमगून निघाली आहे.शनिवारी संध्याकाळी शरयू घाट ते राम पायडीपर्यंत ५ लाखांहून अधिक पणत्या व दिवे लावण्यात आले आहेत. त्यामुळे दीपोत्सवासाठी अयोध्या व शेजारील फैजाबाद शहर दिव्यांनी रंगून गेले. यासोबतच अयाेध्येने २०१८ चा ३.५१ लाख दिवे लावण्याचा आपला स्वत:चाच विक्रम माेडला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्येही याची नोंद झाली.

शनिवारी संध्याकाळी शरयू नदीचा किनारा लाखो पणत्यांनी लखलखला.  दिवे लावण्यासाठी ६ हजार विद्यार्थी, २२० प्राध्यापक व व्याख्याते सहभागी झाले होते. दीपोत्सवासाठी अयोध्या आणि फैजाबाद परिसरात तसेच शरयू नदीच्या तीरावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांबरोबरच धडक कृती दल, प्रांतिक सशस्त्र दलाचे जवान तैनात आहेत. दीपोत्सवासाठी अयोध्येत येणाऱ्यांच्या मार्गांत अडथळा येऊ नये, यासाठी जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. यावेळी बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, आधीची सरकारे अयोध्येत येण्याची भीती बाळगत होती. परंतु मी गेल्या अडीच वर्षात कितीतरी वेळा अयोध्येत आलोय.  केंद्रात मोदी सरकार आल्यापासून भारताचा जगात सांस्कृतिक सन्मान पुन्हा प्रस्थापित झाला आहे. अयोध्येत अशी दिवाळी साजरी करण्यास ७० वर्षे लागली.

शनिवारी येथील साकेत काॅलेजच्या प्रांगणात रामायणातील प्रसंगाशी निगडित ११ यात्रा काढण्यात आल्या, ज्याला फिजीच्या उपसभापती वीणा भटनागर यांनी हिरवा झेंडा दाखवला. येथे देश-विदेशातील एक हजारपेक्षा जास्त कलाकारांनी सादरीकरण केले. नेपाळ, श्रीलंका इंडाेनेशिया व फिलिपाइन्सच्या कलाकारांनी रामलीला मंचन केले. थ्रीडी तंत्रज्ञानाने रामकथा दाखवण्यात आली. बाबरी मशिदीचे वकील इक्बाल अन्सारीही शाेभायात्रेत सहभागी झाले होते.