Ramdev Baba : अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लागू केलं आहे. ज्याचा निषेध देशभरातून नोंदवला आहे. विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान योग गुरु रामदेव बाबा यांचीही प्रतिक्रिया आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ५० टक्के आयात शुल्क लागू करुन मोठी चूक केली आहे असं रामदेव बाबांनी म्हटलंं आहे. अमेरिकेने ही राजकीय गुंडगिरी सुरु केली आहे असंही रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे.
रामदेव बाबा काय म्हणाले?
रामदेव बाबा म्हणाले, अमेरिकीन कंपन्या, त्यांचे ब्रांड यांच्यावर बहिष्कार घाला. एकाही भारतीयाने पेप्सी, कोका कोला, सबवे, केएफसी आणि मॅक डोनाल्ड्स या ठिकाणी जाऊच नका. या सगळ्या कंपन्या आणि ब्रांड्सवर असा बहिष्कार टाका की अमेरिकेत हलकल्लोळ माजला पाहिजे. तिथे महागाई इतकी वाढेल की डोनाल्ड ट्रम्प स्वतःहून टॅरिफ मागे घेतील. भारताच्या विरोधात जाऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी खूप मोठी चूक केली आहे. असंही रामदेव बाबा म्हणाले.
भारत सगळ्या आव्हानांना सामोरा जाईल
कुठल्याही आव्हानांना भारताने घाबरुन जाऊ नये. त्याऐवजी त्या आव्हानांचा आपण सामना करावा. भारत या आव्हानाला समर्थपणे तोंड देऊ शकतो. अमेरिकेतील कंपन्या आणि उत्पादनं यावर बहिष्कार घाला. आज आपल्याकडे बहिष्कार घालण्याची संदीही आहे. भारत हा कमकुवत देश नाही. भारताशी दादागिरीने वागून डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी चूक केली आहे असंही रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे. अमेरिका हा एक सभ्य देश मानला जात होता. मात्र ट्रम्प यांनी सगळी मूल्यं उद्ध्वस्त केली. असंही रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे. तसंच ट्रम्प हे सरड्याप्रमाणे रंग बदलत असल्याचीही टीका त्यांनी केली आहे.