बाबरी मशीद विध्वंस हा पूर्वनियोजित कट नव्हता, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते करत असले तरी उत्तर प्रदेशातील शिवसेनेच्या माजी नेत्याने हा पूर्वनियोजित कट असल्याचे म्हटले आहे. मशीद पाडण्यासाठी कारसेवकांना वर्षभर प्रशिक्षण देण्यात आले होते. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश या तीन राज्यांमध्ये हे प्रशिक्षण देण्यात आले होते असा गौप्यस्फोट या नेत्याने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अयोध्येतील राम जन्मभूमीवरील वादग्रस्त बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशींसह अन्य नेत्यांविरोधात गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी खटला चालवण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर बाबरी मशीद आंदोलनातील मुख्य आरोपी पवन पांडेने ‘एबीपी न्यूज’ या वृत्तवाहिनीशी बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी जे काही झाले तो पूर्वनियोजित कट होता आणि याची तयारी काही वर्षांपासून होत होती असे पांडेने म्हटले आहे.

पवन पांडेने केलेल्या दाव्यानुसार कारसेवकांना १९९२ ते १९९२ या कालावधीत बाबरी मशीद पाडण्याचे प्रशिक्षण दिले गेले. हे प्रशिक्षण नेमके कुठे दिले आणि यात कसले प्रशिक्षण देण्यात आले हे मला अजूनही आठवत असल्याचे पांडेने सांगितले. पवन पांडे हा बाबरी प्रकरणातील आरोपी असून १९९२ मध्ये पवन पांडे उत्तर प्रदेशमधील शिवसेनेचा प्रमुख होता. अडवाणींना या संपूर्ण घटनेची पूर्वकल्पना होती असा दावाही पांडेने केला आहे.

पवन पांडे १९८६ मध्ये शिवसेनेत दाखल झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मला उद्धव आणि राज ठाकरेनंतर तिसरा मुलगा मानायचे असेही पांडेचे म्हणणे आहे. १९८९ मध्ये लालकृष्ण अडवाणींच्या रथयात्रेत पवन पांडेही सहभागी झाला होता. याच रथयात्रेदरम्यान तो राममंदिर आंदोलनाचे प्रमुख संत आणि रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष रामचंद्र परमहंस यांच्या संपर्कात आला. १९९० मध्ये मुलायमसिंह यांच्या सरकारने कारसेवकांवर केलेल्या गोळीबारात पांडे बचावला होता. या आंदोलनात पवन पांडे सुमारे १७ वेळा तुरुंगात गेला होता.

पवन पांडेच्या गौप्यस्फोटाने लालकृष्ण अडवाणींच्या अडचणी वाढल्या आहेत. लालकृष्ण अडवाणी यांनी यापूर्वी अनेकदा बाबरी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता असा खुलासा होता. माझ्या आयुष्यातील ही दु:खद घटना असून, कारसेवक मशिदीच्या दिशेने जात असताना मी त्यांना परत या असे आवाहनही केले होते, असे अडवाणींनी म्हटले होते. पण अडवाणींच्या या दाव्याला छेद देणारे विधान पवन पांडेने केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Babri masjid demolition case lk advani shivsena ex mla pawan pandey kar sevak training
First published on: 25-04-2017 at 10:32 IST