Suhas Shetty Case : कर्नाटकमधील मंगळुरूमध्ये बजरंग दलाचे माजी सदस्य सुहास शेट्टीची अज्ञातांनी हत्या केल्याची घटना घडली. या घटनेनंतर मंगळुरूमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीसह ८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, सुहास शेट्टी यांच्या हत्येच्या घटनेनंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आणि हिंसाचार आणखी वाढू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, १ मे रोजी रात्री ८.२७ वाजता सुहास शेट्टी हा एका कारमधून जात होता. यावेळी त्याच्याबरोबर आणखी काही जण देखील होते. याचवेळी त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
सुहास शेट्टीच्या गाडीला दोन गाड्यांनी अडवण्यात आलं. त्यानंतर दोन वाहनातून आलेल्या पाच ते सहा जणांनी शेट्टीवर तलवार आणि इतर शस्त्रांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात सुहास शेट्टी गंभीर जखमी झाला. यानंतर जवळच्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारा दरम्यान सुहास शेट्टीचा मृत्यू झाला होता. आता या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दरम्यान, सुहास शेट्टीची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाला भेट देत गुन्हा दाखल केला होता. तसेच आरोपींच्या अटकेसाठी अनेक विशेष पथके तयार करण्यात आली होती. तसेच शेट्टीच्या हत्येनंतर कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाच्या अनुषंगाने मंगळुरू शहराचे पोलीस आयुक्त अनुपम अग्रवाल यांनी शरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले, सार्वजनिक मेळावे, मिरवणुकांवर ६ मे पर्यंत बंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत.