भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांचे सहकारी संजय सिंह यांनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या (WFI – कुस्ती महासंघ) अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. या निकालामुळे ज्या कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याचे आरोप करत आंदोलन केलं होतं त्यांच्यात नाराजी पसरली आहे. संजय सिंह अध्यक्ष होताच बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाटने नाराजी व्यक्त केली. या तिघांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. दरम्यान, संजय सिंह निवडणूक जिंकल्यानंतर साक्षी मलिकने कुस्तीला कायमचा रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. तर कुस्तीपटू बजरंग पुनिया यानेही मोठा निर्णय घेतला आहे. “मी माझा पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांना परत करणार आहे”, अशी त्याने घोषणा केली होती. त्यानुसार बजरंगने त्याच्या पुरस्काराचा त्याग केला आहे.

पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केल्यानंतर काहीच वेळात बजरंग पुनिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार परत करण्यासाठी निघाला. परंतु, पंतप्रधान निवासाजवळ तिथल्या सुरक्षारक्षकांनी बजरंगला रोखलं. बजरंग पंतप्रधानांपर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे त्याने पंतप्रधानांच्या घराजवळच्या पदपथावर (फूटपाथ) त्याचा पद्मश्री पुरस्कार ठेवला आणि तिथून निघून गेला.

भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदासाठी गुरुवारी (२१ डिसेंबर) निवडणूक पार पडली. संजय सिंह यांनी या निवडणुकीत माजी कुस्तीपटू अनिता शेरॉन यांचा पराभव केला. एकूण ४७ जणांनी या निवडणुकीत मतदान केलं. यापैकी ४० मतं संजय सिंह यांच्या पारड्यात पडली तर अनिता यांना केवळ सात मतं मिळाली. निवडणुकीच्या या निकालानंतर कुस्तीपटू नाराज झाले आहेत.

बजरंग पुनियाचं पंतप्रधानांना पत्र

दरम्यान, कुस्तीपटू बजरंग पुनियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्याने म्हटलं आहे की, “मला आशा आहे की, तुमची प्रकृती ठीक असेल. तुम्ही देशाच्या सेवेमध्ये व्यस्त असणार. तुमच्या व्यस्ततेदरम्यान मी आपलं लक्ष कुस्तीकडे वळवू इच्छितो. आपल्याला माहितच आहे की, यावर्षी जानेवारी महिन्यात भारतीय महिला कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. त्या महिला कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू केले, तेव्हा मीही त्यात सहभागी झालो होतो. सरकारने आंदोलकर्त्यांना ठोस आश्वासन दिल्यानंतर जानेवारी महिन्यातच कुस्तीपटू आपापल्या घरी निघून गेले. मात्र तीन महिन्यानंतरही ब्रिजभूषण सिंह यांच्यावर एफआयआरही दाखल झाला नव्हता.”

“एप्रिल महिन्यात कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा आंदोलन केलं. तरही बृजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. शेवटी कुस्तीपटूंना न्यायालयात जाऊन गुन्हा दाखल करावा लागला. जानेवारीमध्ये तक्रारदार महिलांची संख्या १९ होती, जी एप्रिल महिना येईपर्यंत सात राहिली. म्हणजे केवळ तीन महिन्यात बृजभूषण सिंहने आपल्या ताकदीच्या जोरावर १२ महिलांना न्याय मिळण्यापासून अडवले. आमचे आंदोलन ४० दिवस चालले या ४० दिवसांत आणखी एक महिला मागे हटली. आमच्यावर खूप दबाव टाकला गेला. आंदोलन करू नये म्हणून दिल्लीच्या बाहेर काढण्यात आले”

हे ही वाचा >> VIDEO : बजरंग पुनियाने फूटपाथवर ठेवला ‘पद्मश्री’, मोदींना भेटू न दिल्याने पंतप्रधानांच्या घराबाहेर फूटपाथवर ठेवलं पदक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आम्ही आमची पदकं गंगा नदीत वाहण्याचा निर्णय घेतला. आम्ही गंगा तटावर गेलो. परंतु, तिथे आम्हाला आमच्या प्रशिक्षकांनी आणि शेतकरी नेत्यांनी अडवलं. त्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांच्याशी आमचं बोलणं झालं. त्यांनी आम्हाला महिला कुस्तीपटूंना न्याय मिळवून देऊ असं आश्वासन दिलं. त्याचबरोबर कुस्ती महासंघातून बृजभूषण सिंह आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना, त्याचबरोबर त्यांच्या साथीदारांना बाहेर करू असं आश्वासनही दिलं होतं. परंतु, तसं काहीच झालं नाही.”