मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत मोठी घोषणा केली आहे. प्रभू श्री रामचंद्राच्या जन्मस्थळी अयोध्या येथे हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणार, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. यासंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सकारात्मक भूमिका आहे, असेही मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी ( ९ मार्च ) अयोध्येत रामलल्ला आणि मंदिराचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी भेटी दिल्या. मुख्यमत्री शिंदे यांनी राम मंदिरा, हनुमात गढीला भेट देत शरयू नदीवर महाआरती केली. तसेच, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही एकनाथ शिंदेंनी भेट घेतली आहे.

हेही वाचा : “भाजपाची स्क्रिप्ट शरद पवार वाचतात का?”, मनसे नेत्याच्या विधानावर बावनकुळेंचे प्रत्युत्तर; म्हणाले…

प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “अयोध्येत राम मंदिर व्हावे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि तमाम राभक्त हिंदुत्ववाद्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. रामाच्या आशीर्वादानेच आपल्याला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाले.”

हेही वाचा : “अयोध्येत जाऊन रामनामाचा जप करणाऱ्यांच्या तोंडात राम अन्…”; ठाकरे गटाचा शिंदे गट-भाजपावर हल्लाबोल!

“अयोध्या आणि राम आमच्या राम मंदिर हा आमच्यासाठी राजकारणाचा नव्हे तर सर्वांसाठी श्रद्धेचा, अस्मितेचा, हिंदुत्वाचा विषय आहे. त्यामुळे हिंदुत्वाला विरोध करणाऱ्यांची दुकाने आता बंद होतील,” असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला लगावला आहे.