Bangladesh Protest : बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसाचाराच्या घटना सुरु आहेत. हिंसाचाराच्या घटनानंतर शेख हसीना यांनी ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत देश सोडला. त्यानंतर बांगलादेशमध्ये नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन झालं. मात्र, यानंतरही अद्याप बांगलादेशमधील परिस्थिती पूर्व स्थितीत आलेली नाही. आता बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलक विद्यार्थी आक्रमक झाले होते. तसेच आंदोलक विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयालाही घेराव घालण्याचा प्रयत्न करत सरन्यायाधीशांनीही पदाचा राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली होती. सरन्यायाधीशांनी राजीनामा दिला नाही तर त्यांनाही खुर्चीवरून खाली खेचू, असा इशारा आंदोलकांनी दिला होता. यानंतर बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी राजीनामा दिला. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे.
दरम्यान, बांगलादेशचे सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांची एका वर्षापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, ओबेदुल हसन हे शेख हसीना यांच्याबरोबर संगनमत करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला होता. यानंतर सरन्यायाधीशांनी बैठक बोलावत राजीनामा दिला असल्याचं वृत्त आहे.
Chief Justice Obaidul Hassan has decided to step down from his post as the head of the judiciary body of Bangladesh in the face of protest by Students Against Discr*imination.
Details:https://t.co/b0RbO6Qwi2#dhakatribune #NewsUpdate #ChiefJustice #obaidulhassan pic.twitter.com/pl2HIpfFsLThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Dhaka Tribune (@DhakaTribune) August 10, 2024
बांगलादेशी सूत्र मोहम्मद युनूस यांच्या हाती
शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत देशातून पलायन केल्यानंतर मोहम्मद युनूस यांनी देशाच्या कारभाराची सूत्र आपल्या हातात घ्यावी, अशी मागणी बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलकांकडून करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर मी सरकारचा सल्लागार म्हणून काम करेन, अशी ग्वाही मोहम्मद युनूस यांनी दिली होती. त्यानंतर मोहम्मद युनूस हे परदेशातून बांगलादेशमध्ये परतले होते. यानंतर त्यांनी अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतली. दरम्यान, बांगलादेशमधील लष्कराने मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरीम सरकारला पूर्ण समर्थन देण्याचा निर्णय घेतला असला तरी देशात निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अनेक आव्हानांचा सामना मोहम्मद युनूस यांच्या अंतरीम सरकारला करावा लागणार आहे. त्यामुळे मोहम्मद युनूस यांच्यासाठी हे सरकार चालवणे आव्हानात्मक असणार आहे.
