Muhammad Yunus : बांगलादेशात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचं कारण म्हणजे बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस हे राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याची माहिती समोर आली आहे. बांगलादेशात सध्या असणारी राजकीय परिस्थिती पाहता अशा वातावरणात येथील राजकीय पक्षांबरोबर काम करणं कठीण होत असल्याचं मत मोहम्मद युनूस यांनी बोलून दाखवलं असल्याची चर्चा आहे.
त्यामुळे मोहम्मद युनूस हे राजीनामा देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. यातच बांगलादेशच्या लष्कर प्रमुखांनी येत्या डिसेंबरपर्यंत निवडणुका घेण्याचं सांगितलं आहे. त्यामुळे बांगलादेशात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, या सर्व चर्चांवर आता मोहम्मद युनूस यांचे विशेष सहाय्यक फैज अहमद तय्यब यांनी प्रतिक्रिया देत युनूस हे आपल्या पदाचा राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र, पुढे बोलताना मोहम्मद युनूस यांना सत्तेचा लोभ नसल्याचंही त्यांनी म्हटलं. त्यामुळे पुन्हा वेगवेगळ्या चर्चांनी जोर धरला आहे.
बांगलादेशचे लष्कर प्रमुख वकेर-उझ-जमान यांनी डिसेंबरपर्यंत निवडणुका घेण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे. पण यावरून मुहम्मद युनूस यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा स्पष्ट केलं आहे की अंतरिम सरकारचं काम केवळ निवडणुका घेणं नाही तर त्यापलिकडे आहे. सुधारणा आणि न्याय ही प्राथमिकता असल्याचं सांगत युनूस यांच्या सहकाऱ्यांनी डिसेंबरच्या निवडणुकीच्या मागणीवर नकार दिला. तसेच जून २०२६ पर्यंत निवडणुका होतील असं सांगितलं.
तसेच मोहम्मद युनूस राजीनामा देणार नाहीत, आणि एप्रिल किंवा मे २०२६ मध्ये निवडणुका होतील, असे संकेत फैज अहमद तैय्यब यांनी दिले आहेत. तसेच यावर सल्लागार सय्यदा रिझवाना हसन यांनी म्हटलं की, निवडणूक केवळ प्राधान्य नाही. आमच्यावर तीन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. सुधारणा, न्याय आणि निवडणुका. आम्ही ही जबाबदारी केवळ निवडणुका घेण्यासाठी स्वीकारली नाही, असं म्हणत लष्कर प्रमुखांच्या इशाऱ्याला विरोध केला. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दरम्यान, मोहम्मद युनूस सरकारचे विशेष सल्लागार फैज अहमद तैय्यब यांनी म्हटलं की, मोहम्मद युनूस हे राजीनामा देणार नाहीत. तसेच त्यांच्या मतांनुसार निवडणुकीची अचूक तारीख जाहीर करणं हे केवळ मोहम्मद युनूस यांच्या अधिकारक्षेत्रात येतं. इतर कोणीही त्या अधिकाराचं उल्लंघन करू शकत नाही. जेव्हा त्यांना अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती करण्यात आली तेव्हा त्यांनी विमानतळावर म्हटलं होतं की तुम्हाला माझं ऐकावं लागेल”, असं फैज अहमद तैय्यब यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, बांगलादेशात निवडणुका घेणं आता एक वादाचा मुद्दा बनला असल्याची परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. लष्करप्रमुख जनरल वकेर-उझ-जमान यांनी २१ मे रोजी युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने डिसेंबरपर्यंत निवडणुका घ्याव्यात, असं म्हटलं आहे. तसेच दुसरीकडे १० मे रोजी अवामी लीगवर बंदी घालण्यात आल्यानंतर संपूर्ण देशात उपस्थिती असलेला एकमेव मोठा पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने निवडणुकीसाठी रोड मॅप तयार करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, मुहम्मद युनूस यांनी यापूर्वीही सांगितलं होतं की पुढील वर्षी जूनपर्यंत निवडणुका होणार नाहीत.