Bank official arrested stole Rs 4.58 crores from FDs Crime News : बरेच जण मोठ्या कष्टाने कमावलेला पैसा सुरक्षित राहावा म्हणून तो बँकेत ठेवतात. पण आता बँकेत देखील तुमचा पैसा सुरक्षित नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राजस्थानमधील कोटा येथे एका महिला बँक कर्मचार्‍याने ग्राहकांचा ४ कोटींहून जास्त रुपयांच्या ठेवी पळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेने कमी कालावधीत जास्त परतावा मिळवण्याच्या उद्देशाने या महिलेने ही रक्कम शेअर बाजारात गुंतवली. तिने बँकेच्या ४१ हून जास्त ग्राहकांचा पैसा यासाठी वापरला. हा घोटाळा जवळपास दोन वर्ष सुरू होता पण बँकेतील कोणालाही याबद्दल कसलीच कल्पना नव्हती.

बहिणीच्या लग्नातून केलं अटक

या महिला अधिकार्‍याचे नाव साक्षी गुप्ता असे असून ती आयसीआयसीआय बँकेत रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम करते. ‘यूजर एफडी (फिक्स्ड डिपॉझिट)’ लिंकचा गैरवापर केला आणि २०२० ते २०२३ या काळात ४१ ग्राहकांच्या ११० खात्यातून ४.५८ कोटी रुपये काढून घेतले. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, गुप्ताने हा पैसा शेअर बाजारात गुंतविला. पण शेअर बाजारात तिला मोठे नुकसान झाल्यानंतर ती हे पैसे खात्यात जमा करू शकली नाही. आता तिला अटक करण्यात आली असून तिला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. काल रात्री पोलिसांनी तिला तिच्या बहिणीच्या लग्नातून अटक केली.

एक ग्राहक त्याच्या एफडीबद्दल चौकशी करण्यासाठी बँकेत आल्यानंतर हा सर्व प्रकार उजेडात आला. यानंतर बँकेने १८ फेब्रुवारी रोजी या प्रकरणात गुन्हा नोंदवला. या महिलेने ग्राहकांनी त्यांच्या खात्यांना लिंक केलेले मोबाईल नंबर देखील बदलले होते, जेणेकरून त्यांना पैसे काढल्याबद्दल मेसेज द्वारे माहिती मिळू नये.

या प्रकरणाचा तपास करत असलेले अधिकरी इब्राहिम खान म्हणाले की, “तिने तिच्या कुटुंबातील सदस्यांचे फोन नंबर या खात्यांशी जोडले होते आणि ४ कोटींहून अधिक रुपये काढले. खातेधारकांना या घोटाळ्याबद्दल माहिती होऊ नये म्हणून तिने तिच्या सिस्टमवर ओटीपी मिळवण्यासाठी एक सिस्टम देखील तयार केली होती.”

आयसीआयसीआय बँकेने अद्याप याबद्दल अधिकृतपणे कोणतेही माहिती दिलेली नाही. मात्र एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृ्त्तानुसार, पैसे काढण्यात आलेल्या ग्राहकांना बँकेकडून भरपाई दिली जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.