अमेरिकेत आलेल्या ‘रिपब्लिकन सुनामी’चा डेमोक्रेटिक पक्षाला जोरदार तडाखा बसला असला तरी प्रशासनाने राबविलेल्या धोरणांबाबत आणि आपल्या भूमिकांबाबत अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा ठाम आहेत. ओबामा प्रशासन राबवणार असलेल्या ‘अनिवासी नागरिक सुधारणा’ कायद्याचा फटका सिनेट निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाला बसला असला तरी या कायद्याची अंमलबजावणी करण्यात असल्याचे ओबामा यांनी सांगितले. या कायद्यान्वये अमेरिकेत बेकायदा राहत असलेल्या १.१० कोटी नागरिकांना कायद्याने मान्यता मिळणार आहे. यामध्ये अमेरिकेत राहणाऱ्या दोन लाख ४० हजार भारतीयांचा समावेश आहे.
मंगळवारी काँग्रेस व सिनेट निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाने डेमोक्रेटिकचे वर्चस्व मोडीत काढत प्रतिनिधीगृहातील आपल्या मताधिक्यात वाढ केली होती. रिपब्लिकन प्रतिनिधींशी काम करण्यास तयार असल्याचे ओबामा यांनी सांगितले, मात्र तरीही आपल्या भूमिका बदलणार नसल्याचेही ते ठामपणे म्हणाले. ‘‘या निवडणुकीमुळे मतदारांचा कौल मला जाणून घेता आला.
ज्यांनी आम्हाला मतदान केले, त्यांचे म्हणणेही समजले आणि त्यांनी नाही केले त्यांनाही जाणून घेता आले,’’ असे ओबामा म्हणाले.
‘‘अमेरिकेबाबत मी खूपच आशावादी आहे. आपली अर्थव्यवस्था इतर देशांप्रमाणे बलशाली आहे. मात्र आपल्याला अजूनही खूप प्रगती करायची आहे. जगात सवरेत्कृष्ट आणि प्रतिभाशाली देश असल्याची अमेरिकेची प्रतिमा यापुढेही कायम राहील. आगामी दोन वर्षांत आम्ही काँग्रेस सदस्यांना सोबत घेऊन काही धोरणे राबवणार आहोत. काँग्रेस सदस्य सोबत नसतील तरीही अमेरिकेच्या विकासासाठी आम्ही आमची विकासात्मक धोरणे राबवणारच आहोत,’’ असे ओबामा म्हणाले.