गेल्या काही दिवसांपासून देशात करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. केरळमध्ये करोना विषाणूच्या जेएन १ या अतिसंसर्गजन्य उपप्रकाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून सावधगिरी आणि दक्षता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात नुकतंच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी एका उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील आरोग्य मंत्र्यांना आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय सेवांच्या तयारीबाबत विचारणा केली. तसेच यावेळी काही निर्देशही देण्यात आले.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी आयोजित केलेल्या या बैठकीत करोनासंबंधित विषयावर चर्चा झाली. यावेळी ते म्हणाले, आपल्याला एकमेकांबरोबर काम करण्याची हीच वेळ आहे. आपण घाबरुन न जाता सतर्क राहणे गरजेचे आहे. विविध रुग्णालयातील आरोग्य सुविधा, लोकांशी वेळोवेळी संवाद साधणे, त्यांना सावध करणे हे फार महत्त्वाचे आहे.
तसेच राज्यातील सर्व रुग्णालयात दर ३ महिन्यांनी एकदा मॉक ड्रिल घेण्यात यावे. यासाठी केंद्र सरकारकडून राज्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल. यात कोणताही हलगर्जीपणा करु नये, अशी सूचनाही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
आरोग्य क्षेत्र हे कोणत्याही राजकारणाचे क्षेत्र नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालय हे सर्व मदतीसाठी उपलब्ध असेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान सध्या केरळमध्ये करोना विषाणूच्या जेएन १ या प्रकारातील रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. तसेच जगातील अनेक देशातही करोनाचे नवे रुग्ण आढळत आहेत.