Vadodara Crash Accused Rakshit Chaurasia: वडोदरा येथे भरधाव वाहन चालवून तीन वाहनांना धडक देऊन एका महिलेच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या रक्षित चौरसियाचा आणखी प्रताप समोर आला आहे. २३ वर्षीय रक्षित चौरसियाला मागच्या महिन्यातच पोलिसांनी उचलला होता, मात्र केवळी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले होते. सयाजीगंज पोलीस ठाण्यात रक्षित आणि त्यांच्या मित्रांच्या विरोधात एका वकिलाने तक्रार दाखल केली होती.

फतेहगंज परिसरात असलेल्या एका इमारतीमध्ये रक्षित आणि त्याचे मित्र गोंधळ घालत होते. त्यांच्या आवाजाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्याच इमारतीमध्ये कार्यालय असलेल्या एका वकिलाने त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. मात्र यानंतर संतापलेल्या रक्षित आणि त्याच्या मित्रांनी उलट वकिलावरच दमबाजी केली. वकिलाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गोंधळ घालणाऱ्या तरूणांना ताब्यात घेतले.

पोलीस ठाण्यात प्रकरण गेल्यानंरत आरोपी रक्षित चौरसियाने तक्रारदारांची माफी मागितली. लेखी दिलगिरी लिहून दिल्यानंतर पोलिसांनी रक्षित चौरसियाला सोडून दिले होते. तक्रारदार आणि आरोपींनी आपापसात प्रकरण मिटवून घेतल्यानंतर पोलिसांनी याबद्दल स्टेशन डायरीत नोंद केली नव्हती.

होळीच्या दिवशी भीषण अपघात

१३ मार्च रोजी होळीच्या दिवशी रक्षित चौरसियाने वडोदराच्या करेलीबाग परिसरात त्याच्या वाहनाने तीन वाहनांना धडक दिली. या घटनेत दुचाकीवर बसलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला. सदर अपघाताचा एक व्हिडीओही समोर आला आहे. ज्यामध्ये आरोपी भरधाव वेगात वाहन चालवत असल्याचे दिसत आहे. तसेच तीन वाहनांना धडक दिल्यानंतर तो वाहनातून बाहेर येऊन अनदर राऊंड, निकिता आणि ओम नमः शिवाय अशा घोषणा देतो.

अपघात झाला त्याठिकाणी उपस्थित असलेल्या स्थानिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी आरोपी नशेच्या अंमलाखाली असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे होते. यावेळी रक्षितबरोबर गाडीत बसलेला प्रांसू चौहान नामक तरुणाने घटनास्थळावरून पळ काढला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रक्षित चौरसिया हा एमएस विद्यापीठातील विधी शाखेचा विद्यार्थी आहे. आता त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा खटला दाखल करण्यात आला आहे. अपघात झाला त्यावेळी आरोपी रक्षित नशेच्या अंमलाखाली होता का? याचा तपास पोलीस करत आहेत.