पश्चिम बंगालमधील चित्रपट, दूरचित्रवाणी व नाटय़ अभिनेते पियूष गांगुली (वय ५०) यांचे गेल्या आठवडय़ातील अपघातात जखमी झाल्यानंतर आज शहर रुग्णालयात पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा यांचा समावेश आहे.
पहाटे २.४५ वाजता त्यांचे सर्व अवयव निकामी झाले असून मंगळवारी ते रस्ता अपघातात गंभीर जखमी झाले होते, असे बेली व्ह्य़ू क्लिनिकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांना कृत्रिम श्वासयंत्रणेवर ठेवण्यात आले होते. त्यातच त्यांची प्रकृती काल आणखी ढासळली होती. त्यांची प्रकृती इतकी खराब झाली की, डॉक्टरांना दुसरी शस्त्रक्रिया रद्द करावी लागली. ती काल दुपारी करण्यात येणार होती. गांगुली व नृत्यांगना मलाबिका सेन हे दोघेही एमयूव्ही वाहन बसवर समोरासमोर आदळल्याने २० ऑक्टोबरला हावडा जिल्ह्य़ातील सतरांगची येथे जखमी झाले होते. एका कार्यक्रमानंतर परत जात असताना हा अपघात झाला. सेन यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांची रुग्णालयात भेट घेतली होती. गांगुली यांची कारकीर्द नाटय़ अभिनेते म्हणून सुरू झाली.