केरळमध्ये करोना विषाणूचा फैलाव वाढत चालल्याने बंगालमधील एका सुताराने तिथून पळ काढला. त्यामुळे त्याला आपला रोजगारही गमवावा लागला. त्यामुळे कुटुंबासाठी रोजच्या जेवणाचीही त्याला भ्रांत पडली. या पार्श्वभूमीवर त्याने एक लॉटरीचं तिकीट खरेदी केलं आणि त्याचं नशिबचं फळफळलं आणि तो थेट लखपती झाला.

इजारुल असे या सुताराचे नाव आहे. करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे त्याला केरळमधून बाहेर पडावं लागलं आणि तो खच्चून भरलेल्या रेल्वेने बंगालला आपल्या मिर्झापूर या गावी परतला. दरम्यान, लॉटरी लागल्यामुळं शनिवारी तो त्याच्या गावासाठी अक्षरशः हिरो ठरला. लोक त्याच्या प्लॅस्टर न केलेल्या घराला आता भेटी देत आहेत.

इजारूल ज्या भागात राहतो त्या ठिकाणी सुतारकाम करणाऱ्यांना ५०० आणि ६०० रुपये दिवसाला मिळतात. तर केरळमध्ये १००० ते १२०० रुपये मिळतात. त्यामुळेच ज्या ठिकाणी जास्त रोजंदारी मिळेल त्या राज्यांमध्ये जाऊन इजारुल आणि त्याचे सहकारी काम करतात.

दरम्यान, “केरळमधील करोनाच्या भीती पेक्षा काम नसण्याची भीती अधिक वाटत असल्याचे त्याने म्हटले आहे. मी सात दिवसांपूर्वी घरी परतलो. या काळात काम नसल्याने आता कुटुंबाच पालनपोषण कसं करायचं या विवंचनेत मी होतो. माझ्याकडील सर्व साठवलेले पैसेही संपले होते. त्यामुळेच मी लॉटरीचं तिकीट खरेदी करण्याचा विचार केला. मी लॉटरी खरेदी केली आणि त्यानंतर गुरुवारी मी लखपती झालो,” असं इजारूलने म्हटलं आहे.