Bengaluru Central Jail Viral Video Case : बंगळूरुमधील सेंट्रल कारागृहामध्ये कैदी मोबाईलचा वापर करत असल्याचा कथित व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये कुख्यात गुन्हेगारही तुरुंगात मोबाईल वापरत असल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर आता तुरुंगात कैद्यांची जंगी पार्टी झाल्याचा आणखी एक कथित व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून तुरुंग प्रशासनावर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.
व्हायरल होणाऱ्या तुरुंगातील या व्हिडीओत कैदी दारू पिऊन डान्स करताना दिसत आहेत. एवढंच नाही तर व्हिडीओत कारागृहाच्या आतमध्ये दारू, फळे दिसत असून कैदी चक्क डान्स करत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे बंगळूरुमधील हे सेंट्रल कारागृह आहे की एखादं हॉटेल? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
व्हिडीओत नेमकं काय आहे?
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दारूने भरलेले डिस्पोजेबल ग्लास, कापलेल्या फळांच्या प्लेट्स, तळलेले शेंगदाणे (चकणा) आणि काही कैदी भांडी वाजवत आहेत आणि त्यावर काही कैदी डान्स करत तुरुंगात पार्टी करत असल्याचं दिसत आहे. तसेच व्हिडीओमध्ये काही छोट्या दारूच्या बाटल्या दिसत असून कैदी भांडी वाजवण्याच्या आवाजावर नाचताना पाहायला मिळत आहेत.
कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी काय म्हटलं?
तुरुंगात कैद्यांच्या पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गृहमंत्री जी परमेश्वर यांनी प्रतिक्रिया देत तुरुंगातील या प्रकारची सरकारने गंभीर दखल घेतली असल्याचं सांगितलं. तसेच संबंधित घटनेचा अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडून अहवाल मागितल्याचंही गृहमंत्र्यांनी सांगितलं. गृहमंत्री जी परमेश्वर यांनी म्हटलं की, “मी त्यांना (पोलीस महासंचालकांना) अहवाल देण्यास सांगितलं आहे. जर अहवाल समाधानकारक नसेल, तर मी एक वेगळी समिती स्थापन करून चौकशी करेन. मात्र, मी हा मूर्खपणा सहन करणार नाही. आता खूप झालं, कारण अशा गोष्टी पुन्हा घडू नयेत”, असं गृहमंत्र्यांनी म्हटलं.
Another master piece !!
— अखंड भारत ??? (@FlyingBees28) November 9, 2025
Alleged video from the Bengaluru central jail.
pic.twitter.com/1euLlPVzmr
“तुरुंग अधिकारी अनेकदा म्हणतात की कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. पण कर्मचाऱ्यांनी किमान त्यांची कर्तव्ये तरी व्यवस्थित पार पाडले पाहिजेत. जर ते कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचं कारण पुढे करून जर टेलिव्हिजन, मोबाईल फोन आणि इतर गोष्टी कैद्यांना पुरवत असतील तर त्याला तुरुंग का म्हणायचं?”, असा सवालही गृहमंत्र्यांनी उपस्थित केला.
Undated videos have surfaced showing jail inmates using mobile phones and watching TV inside #Bengaluru’s #ParappanaAgrahara Central Jail. pic.twitter.com/pFZK4rMR6l
— Hate Detector ? (@HateDetectors) November 8, 2025
तसेच कैद्यांना मोबाईल फोन उपलब्ध कसे होतात? यावर उत्तर देताना गृहमंत्री जी परमेश्वर यांनी म्हटलं की, कारागृहात फोन किंवा इतर कोणत्याही सुविधा कोणाच्याही हातात नसाव्यात. तसेच तुरुंग अधिकाऱ्यांनी व्हिडीओची सत्यता पडताळण्यासाठी आणि तुरुंगातील सुरक्षेतील त्रुटींसाठी जबाबदार असलेल्यांची चौकशी सुरू असून पुढील कारवाई होईल, असं सांगितलं.
