Air India Express flight Threatens To Crash: अहमदाबादमधील एअर इंडियाच्या बोइंग ड्रीमलायनर ७८७ या विमानाच्या दुर्घटनेची घटना (१२ जून) ताजी असतानाच बंगळुरू विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान पाडण्याची धमकी विमानात बसलेल्या प्रवाशानेच दिली. बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी दुपारी हा सर्व प्रकार घडला असून आज इंडियन एक्सप्रेसने यासंबंधी सविस्तर वृत्त दिले आहे. या प्रकरणी वैमानिकाने वेळीच सुरक्षा यंत्रणेला कळवले आणि धमकी देणाऱ्या प्रवासी महिलेला विमानातून उतरवले. सामान योग्य ठिकाणी ठेवण्यावरून सदर महिलेने केबिन क्रू सदस्यांशी वाद घातला होता. वाद वाढल्यानंतर महिलेने विमान पाडण्याची धमकी दिली.

प्रकरण काय आहे?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरूमधील डॉक्टर व्यास हिरल मोहनभाई या ३६ वर्षीय महिलेने सूरतला जाण्यासाठी मंगळवारी एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान घेतले. दुपारी २.४५ वाजता विमानाचे उड्डाण होणार होते. यावेळी मोहनभाई यांनी आपले सामान २०एफ या सीटच्या वर असलेल्या जागेत न ठेवता विमानाच्या पुढच्या बाजूला ठेवले. केबिन क्रू सदस्यांनी त्यांना सामान त्यांच्या जागेजवळ ठेवण्याची विनंती केली. पण मोहनभाई यांनी त्यास नकार देत केबिन क्रू सदस्यांनीच सामान हलवावे, असे सांगितले.

क्रू सदस्यांनी वारंवार विनंती करूनही आणि वैमानिकाने या वादात हस्तक्षेप करूनही मोहनभाई ऐकायला तयार नव्हत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर प्रवाशांनीही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्यावरही त्या आरडाओरडा करू लागल्या. तसेच त्यांनी सदर विमान पाडण्याची धमकी दिली. यामुळे इतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली.

महिला प्रवासी मोहनभाई यांनी धमकी दिल्यानंतर वैमानिकाने याची माहिती बंगळुरू विमानतळ पोलिसांना दिली. पोलिसांनी त्यांना विमानाखाली उतरवले आणि त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ३५१ (४) आणि ३५३ (१)(ब) नुसार गुन्हा दाखल केला. तसेच नागरी उड्डाण सुरक्षितता कायद्याच्या विरोधात जाऊन विमानात प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याबद्दलही कलम ३(१)(अ) नुसार गुन्हा दाखल केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बंगळुरू विमानतळावर मंगळवारी अशा दोन घटना घडल्या आहेत. दुसऱ्या घटनेत श्रीनगर येथील रहिवासी सदाद मोहम्मद बाबा (२२) याने टर्मिनल एक येथील प्रस्थान गेट क्र. ८ मधून आत शिरण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बाबाला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने सुरक्षा कर्मचाऱ्याला धक्का दिला. पोलिसांनी बाबाला ताब्यात घेतले असून त्याच्यावरही विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.