डॉक्टरला अनेक लोक देवाचं रुप मानतात. जीवदान देणारे म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पण एका सर्जनने डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारं कृत्य केलं आहे. डॉ. महेंद्र रेड्डी या डॉक्टरने त्याच्या डॉक्टर पत्नीला म्हणजेच कृतिकाला भूल देण्याचं इंजेक्शन देऊन संपवलं. तिचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला असं त्याने सुरुवातीला भासवलं. पण सहा महिन्यांनी हा मृत्यू नैसर्गिक नसून हत्या आहे हे पोलिसांना कळलं आणि पोलिसांनी महेंद्रला अटक केली. बंगळुरुमध्ये ही घटना घडली आहे.
बंगळुरुत रहात होतं डॉक्टर दाम्पत्य
महेंद्र रेड्डी आणि कृतिका रेड्डी हे दोघंही डॉक्टर. बंगळुरुतल्या मुन्नेकोलाला भागात हे दाम्पत्य राहात होतं. २१ एप्रिल २०२५ ला डॉ. कृतिका अचानक आजारी झाल्या. डॉ. महेंद्र रेड्डी त्यांना रुग्णालयात घेऊन गेले. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. रुग्णालयात पोहचण्याआधीच कृतिका यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात मराठाहल्ली पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
पोलिसांना मिळाला धक्कादायक पुरावा
पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला. ज्या ठिकाणी गुन्हा घडल्या त्या ठिकाणी पोलिसांनी तपास केला असता त्यांना कॅन्युलाचा सेट, इंजेक्शन ट्युब आणि इतर मेडिकल उपकरणं मिळाली. हे सगळं साहित्य फॉरेन्सिक लॅबकडे तपासासाठी पाठवण्यात आलं. डॉ. कृतिका यांचा व्हिसेराही फॉरेन्सिक लॅबकडे आधीच पाठवण्यात आला होता. व्हिसेरा रिपोर्टवरुन हे स्पष्ट झालं की त्यांच्या शरीरात प्रोपोफोल नावाचं एक औषध गेलं होतं. हे औषध भूल देण्यासाठी वापरलं जातं, हे औषध उपचार म्हणून दिलं जात नाही. हा अहवाल आल्यानंतर कृतिका यांच्या वडिलांनी १३ ऑक्टोबरला त्यांचे जावई डॉ. महेंद्र रेड्डी यांच्या विरोधात हत्येचा आरोप करत गुन्हा दाखल केला.
डॉ. कृतिका यांचे वडील काय म्हणाले?
डॉ. कृतिका यांचे वडील म्हणाले की कृतिका आणि महेंद्र यांचं लग्न २६ मे २०२४ ला झालं होतं. महेंद्र कृतिकाला सांगत होता की मला हॉस्पिटल बांधायचं आहे त्यासाठी तुझ्या माहेरुन पैसे घेऊन ये. आमच्यावरही त्याने दबाव टाकला होता. मात्र नंतर त्याने रुग्णालयाच्या ऐवजी त्याचा दवाखाना मराठाहल्ली भागात सुरु केला. २१ एप्रिलला काय झालं तेदेखील कृतिकाचे वडील मुनी रेड्डी यांनी सांगितलं.
२१ एप्रिल २०२५ ला नेमकं काय घडलं?
मुनी रेड्डी पुढे म्हणाले २१ एप्रिल २०२५ ला कृतिकाला गॅसेसचा त्रास होतो आहे असं सांगत महेंद्रने इंजेक्शन दिलं होतं. त्यानंतर तो रुग्णालयात तिला घेऊन गेला पण त्याने तिला सीपीआर दिला नाही. तिला मृत घोषित करण्यात आलं. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी म्हटलं आहे की डॉ. महेंद्र हा सगळा प्रकार नैसर्गिक मृत्यूचा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत होते. पण व्हिसेरा रिपोर्ट आला आणि डॉक्टरचं पितळ उघडं पडलं. ज्यानंतर या डॉक्टरला अटक करण्यात आली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.