चार दिवसांपूर्वी बंगळुरूमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त झाल्याचं पाहायला मिळालं. महिलांच्या पीजी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या बिहारमधील २२ वर्षीय तरुणीची एका तरुणाने गळा चिरून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यामुळे शहरात खळबळ उडाली. आधी या प्रकरणात प्रियकरानं प्रेयसीची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, नंतर खरा प्रकार समोर आला. या घटनेचं CCTV फूटेज आता व्हायरल होत असून त्यावर नेटिझन्सकडून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

नेमकं काय घडलं बंगळुरूमध्ये?

बंगळुरूच्या कोरामंगल भागामध्ये मंगळवारी अर्थात २३ जुलै रोजी हा सगळा प्रकार घडला. मंगळवारी रात्री ११ ते ११.३० च्या दरम्यान मारेकरी तरुण या पीजी हॉस्टेलमध्ये शिरला. त्याची मृत तरुणीशी आधी झटापट झाली. त्यानंतर मारेकऱ्यानं तरुणीवर चाकूनं वार केले. तिचा गळा चिरून तिची हत्या केली आणि तो तिथून पसार झाला. हा सगळा प्रकार हॉस्टेलमधील त्या मजल्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

काय आहे CCTV मध्ये?

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये हा मारेकरी त्या मजल्यावरच्या शेवटच्या खोलीजवळ गेल्याचं दिसत आहे. यावेळी त्याच्या हातात एक छोटी बॅगही दिसत आहे. त्यानं दरवाजा ठोठावल्यानंतर तरुणीनं दरवाजा उघडला. हा तरुण आत गेला. काही क्षणांनंतर ते दोघेही बाहेर आले. तरुणानं तिच्याशी झटापट सुरू केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळी तरुणाच्या हातात चाकूही होता. तरुणीचं डोकं धरून मारेकऱ्यानं तिच्या गळ्यावर चाकूने ४-५ वेळा वार केले. ही तरुणी खाली पडल्यानंतर या मारेकऱ्यानं तिथून पळ काढल्याचंही सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. मारेकऱ्याचा चेहराही सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलीस त्याअनुषंगाने तपास करत आहेत.

नेमका प्रकार काय?

हत्या झालेल्या तरुणीचं नाव क्रिती कुमारी असून ती मूळची बिहारची होती. बंगळुरूमध्ये नोकरीनिमित्ताने आली असताना कोरामंगलमधली त्या इमारतीत पीजी अर्थात पेइंग गेस्ट म्हणून राहात होती. सुरुवातीला प्रेमसंबंधांस नकार हे हत्येचं कारण दिलं जात होतं. मात्र, सदर तरुणीच्या मैत्रिणीशी मारेकऱ्याचे प्रेमसंबंध होते, असं तपासात समोर आलं आहे. आपल्या मैत्रिणीला मृत तरुणीनं तिच्यासोबत पीजी हॉस्टेलमध्ये राहण्यास बोलावलं होतं. ही मैत्रीण मारेकरी तरुणाशी गेल्या काही काळापासून अंतर राखून होती. त्यामुळे क्रिती कुमारीनंच आपल्या प्रेयसीला आपल्याविरुद्ध भडकवल्यामुळे मारेकऱ्यानं रागाच्या भरात क्रिती कुमारीची हत्या केली, असा संशय पोलिसांना आहे.

Pakistan Woman Social Post: “पाकिस्तानमध्ये मुलगी म्हणून जगणं फार कठीण”, तरुणीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल; सांगितला धक्कादायक अनुभव!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, CCTV फूटेजमध्ये आरोपीचा चेहरा स्पष्टपणे दिसला असूनही पोलिसांना अद्याप त्याला अटक करण्यात यश आलेलं नाही. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मात्र, आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल, अशी भूमिका पोलिसांकडून मांडण्यात आली आहे.