पीटीआय, नवी दिल्ली
भारत जोडो यात्रेला कोणीही रोखू शकत नाही. ही यात्रा पुढे जातच राहणार आहे. करोना महासाथीची सबब पुढे करून भाजपने राजकारण करणे थांबवावे. ही यात्रा थांबवण्याचाही प्रयत्न करू नये, असा इशारा काँग्रेसने शनिवारी भाजपला दिला.दिल्लीसह देशभरातील नागरिक या यात्रेला मोठय़ा प्रमाणावर उत्स्फूर्त पाठिंबा देत असल्याने राहुल गांधींची बदनामी करण्याचा आणि यात्रा विस्कळीत करण्याचे प्रयत्न भाजपने केले. परंतु ते यामध्ये अपयशी ठरल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला.
‘करोना’ आणि ‘आरोग्य’ अशा गंभीर मुद्दय़ांना भाजपने आपल्या राजकारणाचे शस्त्र बनवू नये, असे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे माध्यमे व प्रसिद्धीप्रमुख पवन खेरा यांनी सांगितले. त्यांनी इशारा दिला की, भाजपमध्ये यात्रा थांबवण्याची हिंमत असेल तसे करून पहावे. आम्ही करोनासंदर्भातील सर्व नियम व संकेत पाळणार आहेत.
सोनिया गांधी सहभागी
भारत जोडो यात्रेचे दिल्लीत आगमन झाल्यानंतर काँग्रेसच्या माजी अध्यक्ष व संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी या यात्रेत काही काळ सामील झाल्या. यात्रेच्या आश्रम चौकात विश्रामापूर्वी काही मिनिटे राहुल गांधी व प्रियंका गांधी-वद्रा यांच्यासह त्या यात्रेत चालत गेल्या. या यात्रेने नऊ राज्यांतून सुमारे तीन हजार किलोमीटरचा प्रवास करून शनिवारी १०८ व्या दिवशी राजधानी दिल्लीत प्रवेश केला. जानेवारीच्या अखेरीस जम्मू-काश्मीरमध्ये या यात्रेची सांगता होईल.दिल्लीत रविवारी भारत जोडो यात्रेच्या व्यासपीठावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसनेते राहुल गांधी, अभिनेते आणि मक्कल निधी मैअम पक्षाचे नेते कमल हासन आदी.
