बहुजन समाज पक्षाचे नेते आणि व्यावसायिक दीपक भारद्वाज यांच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज(मंगळवार) त्यांचा मुलगा नितेशला अटक केली. नितेशवर आपल्या वडिलांची हत्याकरण्यासाठी पाच कोटी रुपयांची सुपारी एका वकिलाला दिली असल्याचा आरोप आहे. २६ मार्च रोजी दीपक भारव्दाज यांच्या फार्महाउसमध्ये आत येऊ न दिल्याने आणि मालमत्तेतील विभाजनाच्या मुद्द्यावरून भारव्दाज पिता-पुत्रामध्ये फार्महाउसवर वाद झाला होता. पोलिस दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारद्वाज यांच्या हत्येमागे भारद्वाज कुटुंबातील एखाद्या सदस्याचा हात असण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत होती.
या प्रकरणात नितेशने सुपारी दिलेल्या वकिलालाही दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी यापूर्वीच शार्पशुटर पुरुषोत्तम राणा याला अटक केली आहे. राणा हा भारद्वाज यांच्यावर गोळीबार करणा-यांपैकी एक आहे.