दिल्लीचे कायदामंत्री सोमनाथ भारती यांना मंत्रिपदावरून दूर करण्यासाठी दबाव वाढत असतानाच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेतली. या दोघांमध्ये सोमनाथ भारती यांच्यावरून चर्चा झाल्याचे समजते.
वेशाव्यवसाय चालवत असल्याच्या संशयावरून सोमनाथ भारती यांनी आपल्या समर्थकांसह युगांडाच्या एका महिलेच्या घरात शिरून तिला धमकावल्याचा आरोप महिलेने केला. तेथेच त्यांनी पोलीसांशीही हुज्जत घातली. संबंधित महिलेने भारती व अज्ञात व्यक्तीविरोधात पोलीसांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी बुधवारी झालेल्या ओळखपरेडमध्ये संबंधित महिलेने भारती आणि त्यांच्या समर्थकांना ओळखले. भारती आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारती यांनी राजीनामा घ्यावा, यासाठी केजरीवाल यांच्यावर दबाव वाढला आहे.
दिल्लीतील विविध महिला संघटना आणि दिल्लीतील महिला हक्क आयोगानेही भारती यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केजरीवाल यांच्याकडे केली. भारती यांना पदावरून न हटविल्यास सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा कॉंग्रेसने दिला आहे.